महाराष्ट्रामध्ये यंदा मार्च महिन्यात होळीपूर्वीच तापमानात उन्हाचा तडाखा जाणवायला सुरूवात झाली आहे. मुंबई सह कोकण किनारपट्टी पासून अगदी खानदेशात सूर्यनारायण आग ओकत असल्याने उष्णतेचा तडाखा जाणवत आहे. महाराष्ट्रामध्ये जळगावात (Jalgaon) उन्हाचा पारा सर्वाधिक 39 अंशावर गेला आहे. मुंबईमध्येही मागील 2-3 दिवसांपासून ऊन वाढत आहे आणि हा ट्रेंड येत्या काही दिवसांमध्ये असाच वाढता राहणार असल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे प्रखर उन्हाच्या वेळेत म्हणजेच दुपारी 11 ते 3 या वेळेत विनाकारण घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गुजरात, राजस्थान मधून वाहत असलेल्या उष्ण वार्यांचा परिणाम महाराष्ट्रातही जाणवत आहे. सध्या विदर्भ, खानदेशातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा यंदा मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच 40 अंशाच्या जवळ पोहचल्याने ऐन उन्हाळ्यात काय स्थिती असेल याची कल्पना केलेलीच बरी असं म्हटलं जात आहे. नक्की वाचा: वीज ग्राहकांसाठी खुशखबर! 1 एप्रिलपासून वीज दरात 2 टक्क्यांनी घट करण्याचे MERC चे आदेश.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कमाल तापमान
जळगाव - 39 अंश
अमरावती - 37 अंश
चंद्रपूर - 37 अंश
नागपूर - 38 अंश
मालेगाव- 38 अंश
वर्धा - 36 अंश
मुंबई (बोरिवली)- 39 अंश
ठाणे- 35 अंश
नाशिक - 36 अंश
रत्नागिरी - 37 अंश
तुमच्या शहरातील कमाल आणि किमान तापमान पाहण्यासाठी हवामान खात्याच्या या वेबसाईटला भेट देऊ शकता.
दरम्यान यंदा थंडी ओसरताच उन्हाचा पारा चढायला सुरूवात झाल्याने अनेकांना घामांच्या धारा लागल्या आहेत. वातावरणातील हा बदल आणि कोरोना संकट पाहता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. उन्हात बाहेर पडताना सनग्लास, टोपी घालण्याचा तसेच हायड्रेटेड राहण्यासाठी पाणी पित राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.