औरंगाबाद: पासपोर्ट हरवल्याने पाकिस्तानच्या जेल मध्ये 18 वर्ष रहावं लागलेल्या  65 वर्षीय Hasina Begum मायदेशी परतल्या, म्हणाल्या 'स्वर्गात आले'!
Hasina Begum | Photo Credits: Twitter/ ANI

18 वर्ष पाकिस्तानच्या (Pakistan) जेल मध्ये कैद रहिल्यानंतर मंगळवारी (26 जानेवारी) एक 65 वर्षीय महिला औरंगाबाद मध्ये परतली आहे. 18 वर्षांपूर्वी आपल्या पतीच्या नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला गेली होती. तेथेच पासपोर्ट (Passport) हरवल्याने ती जेल मध्ये कैद झाली. दरम्यान काल भारतात दाखल झाल्यानंतर तिच्या नातेवाईक आणि औरंगाबाद पोलिस अधिकार्‍यांनी तिचं स्वागत केलं आहे. हसिना बेगम (Hasina Begum) असं या महिलेचं नाव आहे.

हसिना बेगम यांनी औरंगाबादला पोहचल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, ' पाकिस्तानमध्ये त्या अत्यंत कठीण परिस्थितीमध्ये राहिल्या. मायदेशी परतल्यानंतर अत्यानंद होत आहे. जसे काही स्वर्गात राहत आहे अशी भावना असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पाकिस्तानमध्ये मला जबरदस्ती बंदिवान केलं होतं. तेथून सोडवण्यास मदत केल्याबद्दल त्यांनी औरंगाबाद पोलिसांचे आभार देखील मानले आहेत.

औरंगाबाद मध्ये सिटी चौक ठाण्यातील हद्दीमधील रशीदपुरा भागात राहणार्‍या हसिना बेगम यांचं लग्न उत्तर प्रदेशच्या सहारनपूरच्या दिलशाद अहमदशी झालं होतं. हसिना त्यांच्या पतीच्या काही नातेवाईकांना भेटण्यासाठी 18 वर्षांपूर्वी पाकिस्तानला पोहचल्या. लाहोर मध्ये त्यांनी पासपोर्ट हरवला. त्यानंतर विना पासपोर्ट पाकिस्तानमध्ये आल्याचा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आणि त्यांना तुरूंगवासात ठेवण्यात आले. नक्की वाचा: World's Most Powerful Passports 2021: जपान ठरला जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट, तब्बल 191 देशांमध्ये व्हिसा-फ्री प्रवास; जाणून घ्या भारताचे स्थान.

काही वर्षांपूर्वी त्यांनी पाकिस्तानच्या कोर्टात एक याचिका दाखल करत आपण निर्दोष असल्याचं सांगितलं. त्यानंतर कोर्टानेही औरंगाबाद पोलिसांकडून माहिती मागवली. औरंगाबाद पोलिसांनीही हसिनाचं सिटी चौक भागात घर असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांची सुखरूप सुटका झाली. 3 दिवसांपूर्वी तुरूंगातून सुटलेल्या हसिना पंजाब मार्गे औरंगाबाद मध्ये आल्या आहेत.