Akola Married Lady Suicide: महाराष्ट्राला हादरवून सोडणारी घटना अकोल्यातून (Akola) समोर येत आहे. अकोला जिल्हा सामान्य रूग्णालयात एका 25 वर्षीय आईने आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोदावरी खिल्लारे (वय-25) असे या मृत पीडितेचे नाव आहे. अवघ्या 15 दिवसांपूर्वी गोदावरीने मुलीला जन्म दिला. मात्र गेल्या तीन दिवसांपासून ती बेपत्ता होती. अखेर तिचा मृतदेह वॉर्ड क्रमांक 1 मधील शौचालयात आढळून आला.
डीन डॉ.मीनाक्षी गजभिये यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम येथील गोदावरी खिल्लारे यांना काही दिवसांपूर्वी बाळंतपणासाठी अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 3 मार्च रोजी तिने मुलीला जन्म दिला. दरम्यान, जन्मानंतर काही कारणांमुळे मुलीवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यामुळे आईला डिस्चार्ज देऊनही दाखल करण्यात आले. मात्र ती 15 मार्चपासून अचानक गायब झाली. (हेही वाचा -Suicide: लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून जळगावमधील तरुणाची आत्महत्या)
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कडू यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत गोदावरीच्या सासूने 15 मार्च रोजी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र ती सापडली नाहीत. दरम्यान, सफाई कर्मचारी संपावर असल्याने 15 दिवसांपासून कोणीही शौचालयात गेले नव्हते. आज कर्मचारी स्वच्छतेसाठी गेले असता प्रभाग क्र. 23 ला उग्र वास येऊ लागला. त्यानंतर गोदावरीने दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघड झाले.
दरम्यान, गोदावरीचे सासरे आणि सासू गेल्या 15 दिवसांपासून रुग्णालयात होते. मात्र, आता गोदावरीने मुलीला जन्म दिल्यापासून तिचा सासरच्या मंडळींकडून मानसिक छळ होत असल्याचा आरोप होत असून या कारणामुळेचं तिने आत्महत्या केल्याचं म्हटलं जात आहे. यामागचे नेमके कारण अद्याप समोर आले नसले तरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.