H3N2 in Thane:  ठाण्यामध्ये COVID 19 आणि H3N2 ची लागण झालेल्या वयोवृद्धाचा मृत्यू
Dead| Photo Credit - Pixabay

भारतामध्ये सध्या कोरोना वायरस (Coronavirus) सोबतच ‘H3N2’ इन्फ्ल्युएंझाचे देखील आढळून येत आहेत. या दोन्हींच्या रूग्णांत होणारी वाढ चिंतेची बाब आहे. दरम्यान ठाण्यामध्ये बुधवार (22 मार्च) दिवशी या दोन्ही आजारांची लागण झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. 79 वर्षीय या रूग्णाला सहव्याधी देखील होत्या. त्याच्यावर खाजगी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू होते. या आठवड्यात कोरोनामुळे 3 तर ‘H3N2’ने ठाण्यात पहिल्याच मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

राज्यासह देशात या आजारांवर आणि रूग्णसंख्येवर सरकार, आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. मागील 15 दिवसांतील वाढ चिंताजनक असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन केले जात आहे. पुन्हा मास्क लावून गर्दीच्या ठिकाणी बाहेर पडण्याचं आवाहन केले जात आहे. नक्की वाचा: H3N2 Experts Tips: H3N2 च्या वाढत्या प्रकरणांमुळे नागरिकांमध्ये घबराट; विषाणूची लागण रोखण्यासाठी तज्ञांनी दिल्या 'या' महत्त्वाच्या टिप्स, पहा .

ठाणे जिल्ह्यात सध्या अ‍ॅक्टिव्ह कोविड रूग्ण 306 आहेत. त्यापैकी 206 एकटया ठाणे मनपा भागात आहेत. कल्याण डोंबिवली मध्ये 25, नवी मुंबईत 28, उल्हासनगर मध्ये 3, भिवंडीमध्ये 18, मीरा भाईंदर मध्ये 10 तर ग्रामीण भागात 16 रूग्ण आहेत.

इन्फ्लूएंझा हा एक  विषाणूजन्य आजार आहे. जो हवेतून पसरतो. इन्फ्लूएंझाच्या लक्षणांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे, घशात जळजळ, अंगदुखी, डोकेदुखी, जुलाब, उलट्या यांचा समावेश होतो. ही लक्षणे सहसा उपचारानंतर कमी होतात आणि त्यांची तपासणी करण्याची आवश्यकता नाही. मात्र काही रुग्णांना अधिक त्रास होऊ शकतो. ज्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. सध्या लहान मुलं आणि वयोवृद्ध यांना हा आजार अधिक लक्ष्य करत आहे. यावर उपचार उपलब्ध  असून वेळीच निदान झाल्यास हा आजार जीवावर बेतण्याचा धोका कमी आहे.