महाविकासआघाडी (Maha Vikas Aghadi) सरकारमध्ये मतभेद आहेत. प्रमुख्याने शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांच्यात मोठ्या प्रमाणावर दुरावा आल्याचे विरोधकांकडून सांगितले जाते. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी जोरदार निशाणा साधला आहे. महाविकासआघाडी सरकार घट्ट आहे. आम्ही तिन्ही घटक पक्ष एकत्रच आहोत. मात्र, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्यात मतभेद असल्याचे चित्र निर्माण केले जात आहे, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. गुढीपाडवा मुहूर्तावर मुंबई येथील वडाळा परिसरातील वस्तू आणि सेवा कर भवन इमारतीचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरदृष्यप्रणालीद्वारे केले. या वेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या वेळी ठासून सांगितले की, संपूर्ण देशभरात महाराष्ट्र हे करसंकलनात पहिल्या क्रमांकाचे राज्य ठरले आहे. आपल्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. वस्तू सेवा कर हा देश आणि राज्याचा मोठा आधार आहे. आज वस्तू सेवा कर भवनाचे उद्घाटन होत आहे. विकासकामांतही महाराष्ट्र पुढे राहिल. महाराष्ट्र द्वेशांना मी इतकेच सांगेन की, देशाच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक योगदान देणारे राज्य हे जर महाराष्ट्र नसते तर भारताच्या अर्थव्यवस्थेलाच मोठा धक्का लागला असता. त्यामुळे महाराष्ट्राची बदनामी थांबवा. (हेही वाचा, Vitthal Rukmini Live Darshan: ठाकरे सरकारचा मोठा निर्णय! गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर पंढरीच्या विठुरायाचं थेट दर्शन आजपासून सुरु)
महाविकासआघाडी सरकार एकत्र आहे. सर्व घटक पक्ष एकमेकांसोबत आहेत. त्यामुळे आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. मात्र, हे मतभेद असल्याचे वातावरण वारंवार तयार केले जात आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी या वेळी म्हटले. वस्तू सेवा भवन कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार राहूल शेवाळे, विधान परिषद सदस्य आर. तमिल सेलवन, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोर्ट ट्रस्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक राजीव जलोटा, आयुक्त वस्तू आणि सेवा कर राजीव मित्तल, नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.