प्रताप सरनाईक (Photo Credits-Facebook)

‘ईडी’च्या रडारवर असलेल्या शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Pratap Saranaik) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. टॉप्स सिक्युरिटीला दिलेल्या कंत्राटात कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचे एमएमआरडीएने (MMRDA) स्पष्ट केले आहे. टॉप्स कंपनीवर लावण्यात आलेले आरोप तथ्यहीन असल्याचे एमएमआरडीएने आपल्या अहवालात नमूद केले आहे. टॉप्स कंपनीकडून एमएमआरडीएला 500 सुरक्षारक्षक कंत्राटानुसार दिले होते. त्यापैकी 70 टक्के सुरक्षारक्षक कामावर येत होते. मात्र, तरीही सर्व सुरक्षारक्षकांचे वेतन काढले जात आहे, असा आरोप करत रमेश अय्यर यांनी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल केली होती.

एमएमआरडीएच्या निविदा प्रक्रियेत अनेक कंपन्यांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, या निविदा प्रक्रियेतील 6 कंपन्यांना मान्यता देण्यात आली होती. त्यावेळी टॉप्स कंपनीलादेखील या निविदा प्रक्रियेत मान्यता देण्यात आली होती. निविदा प्रक्रियेत नमदू केल्याप्रमाणे टॉप्स कंपनीने सुरक्षा रक्षक पुरवलेत आणि त्यांना निविदा प्रक्रियेप्रमाणेच निधीदेखील देण्यात आला आहे. तसेच गैरहजर सुरक्षा रक्षकांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दिवसाप्रमाणे दंड आकारण्यात आला आहे, असा अहवाल एमएमआरडीएने दिला आहे. एमएमआरडीएच्या अहवालानंतर प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हे देखील वाचा- Coronavirus Vaccination: मुंबईमध्ये कोरोना व्हायरस लसीकरणासाठी BMC ची जोरदार तयारी; कर्मचार्‍यांना 7 जानेवारीपर्यंत प्रशिक्षण, 80 हजार Health Workers ची नोंदणी

दरम्यान, प्रताप सरनाईक यांच्या विहंग ग्रुप ऑफ बिल्डर्सने बांधलेल्या 2 इमारतींमध्ये 4 मजल्यांचे अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. तर, सोमय्या यांनी 8 वर्षे जुने प्रकरण बाहेर काढून जाणीवपूर्वक बदनामीचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा करणार, असे प्रताप सरनाईक म्हणाले. यानंतर शिवसेना प्रताप सरनाईकनी माझ्याविरुद्ध 100 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल करावाच. त्यांचा भ्रष्टाचार, घोटाळे उघड करण्याचा आमचा लढा सुरूच राहील, अशा आशयाचे ट्विट किरीट सोमय्या यांनी केले होते.