Coronavirus Vaccination (Photo Credit : ANI)

गेल्या 9 महिन्यांपासून संपूर्ण देश कोरोना विषाणूशी (Coronavirus) लढत आहे. सध्या संक्रमणांची संख्या जरी कमी झाली असली तरी अजून धोका टळला नाही. मात्र आता विविध कंपन्यांच्या लसींनी एक नवी आशा निर्माण केली आहे. लवकरच कोरोना विषाणू लसीकरणाला (Coronavirus Vaccination) सुरुवात होणार आहे. यासाठी जवळजवळ सर्वच राज्ये तयारी करत आहेत. मुंबई महापालिकाही (BMC) लसीकरणासाठी सज्ज होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने सुरुवातीला 7 जानेवारी 2021 पर्यंत लसीकरणासाठी आपल्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

सध्या 8 बीएमसी रुग्णालयांनी याची तयारी सुरू केली असून, त्यामध्ये केईएम, शीव, नायर, कूपर, वांद्रे भाभा रुग्णालय, व्ही. एन. देसाई, राजावाडी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय यांचा समावेश आहे. यासाठी आतापर्यंत 80 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी मुंबईतील कोविड पोर्टलवर नोंदणी केली आहे. एकूण 1,26,378 सेवकांचा डेटा अपलोड करण्याची कार्यवाहीदेखील वेगाने सुरु आहे. सार्वजनिक आरोग्य, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, फ्रंटलाइन अभियंते, वाहन चालक, बेस्ट कर्मचारी, स्मशानभूमी कर्मचारी आणि देखभाल विभागातील कर्मचाऱ्यांकडून आघाडीच्या कामगारांचा डेटा संकलित करण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत. बीएमसीने याबाबत माहिती दिली.

लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 17 हजार कोविड योद्ध्यांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात आरोग्य सेवेशी निगडित नवी मुंबई पालिका तसेच खाजगी रुग्णालयातील अधिकारी, डॉक्टर, नर्सेस, फार्मासिस्ट, कर्मचारी, आशा, अंगणवाडी शिक्षिका व मदतनीस तसेच वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थी आदींचा समावेश करण्यात आला आहे. (हेही वाचा: जुलै 2023 पर्यंत कार्यान्वित होईल मुंबईचा कोस्टल रोड; आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण- Iqbal Singh Chahal)

प्रशिक्षणासोबतच कोल्ड स्टोरेजदेखील महत्वाचे आहे. मुंबईतील कांजूरमार्ग भागात असलेल्या आरोग्य सेतु सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना लसीचे कोल्ड स्टोरेज तयार केले जात आहे. या भागातील तीन मजल्यावरील कोल्ड स्टोरेज आणि त्याची देखभाल व इतर महत्वाच्या गोष्टींसाठी तयारी सुरू आहे, प्रथम, एका मजल्यावरील स्टोरेज तयार केले जात आहे, ज्यामध्ये 10 ते 15 लाख लस ठेवण्याची क्षमता असेल. आवश्यकतेनुसार त्यात वाढ केली जाईल.