Mumbai Coastal Road: जुलै 2023 पर्यंत कार्यान्वित होईल मुंबईचा कोस्टल रोड; आतापर्यंत 17 टक्के काम पूर्ण- Iqbal Singh Chahal
Coastal Road | (Photo Credits: BMC/Website)

वाहतुकीची कोंडी किंवा ट्राफिकबाबत (Traffic) महाराष्ट्राची राजधानी मुंबई (Mumbai) हे जगात प्रसिद्ध आहे. मुंबईतील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी शासनाने कोस्टल रोड प्रकल्प (Coastal Road Project) हाती घेतला आहे. गेले दोन वर्षे या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम चालू असून, आता माहिती मिळत आहे की या आठ लेन कोस्टल रोड प्रकल्पाचे सुमारे 17 टक्के काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. पालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी सोमवारी हे सांगितले. दक्षिण मुंबईतील मरीन ड्राईव्हला उत्तर मुंबईतील बोरिवलीशी जोडण्यासाठी 29.2 किमी लांबीचा समुद्रमार्ग प्रकल्प शिवसेनेच्या नेतृत्वात बृहन्मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला आहे.

साधारण 12,721 कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, हा रस्ता जुलै 2023 मध्ये कार्यान्वित होईल असेही चहल यांनी सांगितले. ऑक्टोबर 2018 मध्ये प्रारंभ झालेला किनारपट्टी रस्ता प्रकल्प यापूर्वी 2022 पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले होते. परंतु याच्याशी निगडीत काही खटल्यांमुळे त्याला उशीर झाला. आता नोव्हेंबरपर्यंत 1,281 कोटी रुपये खर्च करून गेल्या काही महिन्यांत भरीव काम केले गेले आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत सुमारे 175 एकर जमीन अरबी समुद्रातून घेण्यात आली असून, आणखी 102 एकर जमीनीचे अधिग्रहण केले जात आहे

39.6 फूट व्यासाची 400 मीटर लांबीची टनेल बोरिंग मशीन, जी सध्या भारतामधील सर्वात लांब आहे ती हद्दीतील जमीनीवर एकत्र केली गेली आहे. मावळा नावाची बोरिंग मशीन दक्षिण मुंबईतील मरीन लाइन्स आणि प्रियदर्शिनी पार्क यांच्यात 1,920 मीटर लांबीचे जुळे बोगदे तयार करणार आहे. दरम्यान, जुलै 2019 मध्ये मुंबई हायकोर्टाने या प्रकल्पाला मंजूर कोस्टल रोड झोन (सीआरझेड) मंजुरी रद्द केल्यानंतर या प्रकल्पाचे काम थांबविण्यात आले होते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिल्यानंतर हे काम पुन्हा सुरू झाले.