महाराष्ट्रामध्ये सत्तेच्या राजकारणाची गणितं बदलल्यानंतर ग्रामीण पातळी वर त्याचे काय परिणाम दिसत आहेत यावरून पुढील निर्णयांचे अंदाज बांधले जाणार आहेत. दरम्यान राज्यात पार पडलेल्या 2950 ग्रामपंचायत निवडणूक निकालांचे (Gram Panchayat Election Result) चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे. आज सकाळपासून मतमोजणी सुरू झाली असून आता बिनविरोध जागा वगळता अन्य ठिकाणचे निकाल हाती येत आहेत. यामध्ये सकाळी 11 वाजेपर्यंतच्या निकालामध्ये भाजपा (BJP) अव्वल ठरल्याचं दिसत आहे.
ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजप 1 नंबरचा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपा पाठोपाठ मतदारांनी पसंती राष्ट्रवादी अजित पवार गटाला दिली आहे. तीन नंबरला शिंदे गट आहे आहे. चौथ्या क्रमांकावर काँग्रेस आहे. तर पाचव्या क्रमांकावर राष्ट्रवादी शरद पवार गट त्या खालोखाल ठाकरे गट आहे. आतापर्यंत लागलेल्या निकालानुसार, भाजपाने आत्तापर्यंत १४२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसने १२० ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवला आहे. शिंदे गटाने ८६ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला १७५ ग्रामपंचायतींमध्ये जागा मिळाल्या आहेत.
बारामती मध्ये 12 ग्रामपंचयती अजित पवारांकडे
बारामती मध्ये सध्या पवार विरूद्ध पवार असा एक सामाना सुरू आहे. राज्यात सत्तांतरानंतर अजित पवार यांनीही शरद पवारांची साथ सोडून सत्तेत सहभाग घेतला. त्यानंतर या ग्रामपंचायतीच्या पहिल्याच निवडणूका आहेत. सध्या एनसीपी पक्षावर दावा कुणाचा यावरून न्यायालयात लढाई सुरू आहे पण निवडणूकीच्या रिंगणात बारामतीमध्ये ग्रामपंचायती अजित पवारांकडे आल्या आहेत. भोंडवेवाडी, म्हसोबा नगर, पवई माळ , आंबी बुद्रुक, पानसरे वाडी, गाडीखेल, जराडवाडी, करंज, कुतवळवाडी, दंडवाडी, मगरवाडी, निंबोडी या 12 ग्रामपंचायती अजित पवारांकडे आहेत.
ग्रामपंचायत निवडणूकीमध्ये भाजपा विरूद्ध अजित पवार गट असा चुरशीचा लढा सुरू आहे. सत्तेत भाजपा आणि अजित पवार एक असले तरीही काही ठिकाणी भाजपा विरूद्ध अजित पवार असा सामना बघायला मिळत आहे.