महाराष्ट्राचे राज्यपाल बी.एस. कोश्यारी (B. S. Koshyari) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकार यांच्यात विविध मुद्द्यांवरून सुरू असलेल्या संघर्षादरम्यान, आता राज्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी गुरुवारी दावा केला की राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान, राजभवन हे ‘राजकीय घडामोडींचा अड्डा’ बनले आहे. मलिक, ज्यांचा पक्ष महाराष्ट्रात शिवसेना आणि काँग्रेससोबत सत्तेत आहे, त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की राज्यपाल कोश्यारी ‘भाजप नेत्यासारखे वागत आहेत’.
राष्ट्रवादीचे नेते मलिक म्हणाले की, ‘भाजपचे नेते आणि कार्यकर्ते कोश्यारी यांना भेटण्यासाठी राजभवनामध्ये जातात्त यात काही नवीन नाही. हे आता स्पष्ट झाले आहे की त्यांच्या (राज्यपालांच्या) पदाचा वापर केवळ राजकीय कारणांसाठी केला जात आहे. राजभवनात आता राजकीय घडामोडी चालत आहेत.’ (हेही वाचा: Ajit Pawar On Corona Restrictions: कोरोना निर्बंधांबबत अजित पवार यांचे महत्त्वाची माहिती)
काही दिवसांपूर्वी कोश्यारी यांनी राज्य सरकारला मुंबईच्या साकीनाका परिसरात एका महिलेवर बलात्कार आणि हत्येच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यासाठी पत्र लिहिले होते. त्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्या पत्राला उत्तर देताना म्हटले होते की, राज्यपालांनी केंद्राला विनंती केली पाहिजे की स्त्रियांच्या सुरक्षिततेशी संबंधित समस्या आणि त्यांच्यावरील वाढत्या हल्ल्यांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे अधिवेशन बोलवावे. राज्यपालांच्या कोट्यातून विधान परिषदेत 12 सदस्यांच्या नामांकनाला होणाऱ्या विलंबाबद्दल राज्य सरकारने कोश्यारी यांनाही लक्ष्य केले आहे.
याआधी महाराष्ट्र सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोप केला होता की, राज्यपालांनी अल्पसंख्याक मंत्रालयाला न विचारता किंवा माहिती न देता परभणीमध्ये दोन वसतिगृहांचे उद्घाटन केले. ही वसतिगृहे औपचारिकपणे विद्यापीठाकडे सोपवली नव्हती, ज्याचे राज्यपाल कुलगुरूही आहेत. राज्यपालांना राज्यात दोन केंद्रीय शक्ती निर्माण करायच्या आहेत का, असा प्रश्न नवाब मलिक यांनी विचारला. राज्यपाल जिल्हाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेत असल्याचा आरोपही करण्यात आला.