Maharashtra Cabinet Expansion: राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापले; काँग्रेस आमदार के. सी पाडवी यांना पुन्हा घ्यायला लावली शपथ
Bhagat Singh Koshari angry on MLA C k Padvi (PC - Facebook)

Maharashtra Cabinet Expansion: आज महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यात महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 3 पक्षांच्या 36 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshari) यांनी या मंत्र्यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ दिली. परंतु, या कार्यक्रमात काही नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. यावेळी भगतसिंह कोश्यारी काँग्रेसचे अक्कलकुवा मतदारसंघाचे आमदार के. सी. पाडवी (C. K. Padvi) यांच्या शपथविधीवेळी संतापलेले पाहायला मिळाले. पाडवी यांनी शपथ घेताना स्वत:चं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे संतप्त झालेल्या कोश्यारी यांनी पाडवी यांना पुन्हा मंत्रिपदाची शपथ घ्यायला लावली.

मंत्रिपदाची शपथ घेताना एक ठराविक नमुना प्रत्येक मंत्र्यांना दिला जातो. आमदाराला या नमुन्यावरील मजकूर वाचणे अपेक्षित असते. परंतु, पाडवी यांनी शपथविधीवेळी आपलं मनोगत व्यक्त केलं. त्यामुळे कोश्यारी पाडवी यांच्यावर संतापले आणि आपल्याला दिलं गेलं आहे तेच वाचावं. अनावश्यक वाचू नये, अशा शब्दांत कोश्यारी यांनी पाडवी यांना सुनावलं.

कोश्यारी पुढे म्हणाले, येथे अनेक ज्येष्ठ नेते बसले आहेत. शरद पवारही येथे आहेत. तुम्ही त्यांना विचारा. त्यांना योग्य वाटत असेल तर माझी काहीही हरकत नाही, असंही कोश्यारी यावेळी म्हणाले. या सर्व प्रकारानंतर पाडवी यांनी पुन्हा मंत्रिपदाची शपथ घेतली. पाडवी यांनी शपथ घेतल्यानंतर घडलेल्या प्रकाराबद्दल राज्यपालांची माफी मागितली. (हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion: मराठवाड्यातील 'या' 6 आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताना शिवसेना पक्षप्रमुख आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतले होते. त्यावेळीही कोश्यारी यांनी नाराजी दर्शवली होती. तसेच विरोधकांनी या मुद्दयावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.