Maharashtra Cabinet Expansion: मराठवाड्यातील 'या' 6 आमदारांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी
Maharashtra Cabinet Expansion (PC-Facebook)

Maharashtra Cabinet Expansion: महाराष्ट्रात आज शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी या मंत्र्यांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. या मंत्रिमंडळात मराठवाड्यातील 6 आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागली आहे. यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षाच्या प्रत्येकी 2 आमदारांचा समावेश आहे.

यात काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेस पक्षाचे दिवगंत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे, राजेश टोपे, शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे आणि अब्दुल सत्तार यांचा समावेश आहे. ठाकरे सरकारमध्ये महाविकास आघाडीतील मराठवाड्यातील प्रत्येक पक्षाच्या 2 आमदारांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे आता मराठवाड्याचा विकास अधिक गतीने होण्यास चालना मिळणार आहे. (हेही वाचा - Maharashtra Cabinet Expansion Live News Updates: अपक्ष नेते राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी घेतली राज्यमंत्री पदाची शपथ)

अशोक चव्हाण -

भोकर मतदारसंघातून विजयी झालेले काँग्रेसचे अशोक चव्हाण यांच्या गळ्यातदेखील मंत्रिपदाची माळ पडली आहे. अशोक चव्हाण यांनी आतापर्यंत आमदार, खासदार, महसूल, उद्योग, सांस्कृतिक, परिवहन अशा विविध महत्वाच्या खात्याचे मंत्री तसेच दोनदा मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षपद यशस्वीरित्या सांभाळलं आहे.

अमित देशमुख -

लातूर मतदारसंघातून मोठ्या फरकाने विजयी झालेले काँग्रेसचे नेते अमित देशमुख यांचीदेखील मंत्रिपदी निवड झाली आहे. अमित देशमुख लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून दोनदा निवडून आले असून यंदाच्या निवडणुकीत त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला होता. अमित देशमुख यांनी भाजपचे उमेदवार शैलेश गोविंदकुमार लाहोटी यांचा दणदणीत पराभव केला होता. तसेच 2002 ते 2008 पर्यंत अमित देशमुख यांनी युवक काँग्रेसचे अध्यक्षपद भूषावलेलं आहे.

धनंजय मुंडे -

मराठवाड्यामध्ये धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दणदणीत पराभव केला होता. विरोधी पक्ष नेतेपद भूषवल्यानंतर धनंजय मुंडे पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिमंडळात दिसणार आहेत. राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे नेते असलेल्या या बहीण-भावांमध्ये जवळपास गेल्या 9 वर्षांपासून संघर्ष सुरू आहे.

राजेश टोपे -

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादीकडून जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघातील आमदार राजेश टोपे यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागली आहे. पाचव्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले राजेश टोपे यांचे नाव स्त्तास्थापेनच्या पहिल्या दिवसापासून आघाडीवर होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक बडे नेते हे भाजप आणि शिवसेनेत जात असताना राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीवर निष्ठा कायम ठेवली. त्यामुळे त्यांना मिळाले कॅबिनेट मंत्रिपद हे त्यांच्या एकनिष्ठचं फळ असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तूळात सुरू आहे.

संदीपान भुमरे -

संदीपान भुमरे यांनी पैठण विधानसभा मतदारसंघातून शिवसेना पक्षाकडून निवडणूक लढवली होती. ते आतापर्यंत 4 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. पैठण विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 मध्ये युती तुटल्याचा फटका अनेक मतदारसंघात सेना-भाजपच्या उमेदवारांना बसला होता. मात्र, शिवसेनेच्या संदीपान भुमरे यांनी अशा कठीण परिस्थितीतही 25 हजार मतांनी विजय मिळवला होता. विधानसभेच्या 1995, 1999 आणि 2004 अशा तीनही निवडणुकीत पैठणकरांनी भुमरे यांनाच पसंती दिली होती. 2009 मध्ये राष्ट्रवादीकडून पराभव झाल्यानंतर पुढच्या निवडणुकीत 2014 मध्ये भुमरे यांनी पैठण मतदारसंघ पुन्हा विजय मिळवला होता. पंचायत समितीपासून भुमरे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली. ग्रामीण भागाशी घट्ट नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे. शिवसेनेच्या पक्षसंघटनेत त्यांचा सिंघाचा वाटा आहे.

अब्दुल सत्तार -

शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड मतदारसंघातून विजय मिळवला होता. त्यांनी अपक्ष उमेदवार प्रभाकर पालोदकर यांचा पराभव केला होता. सत्तार यांच्या गल्यात कॅबिनेट मंत्रिपदाची माळ पडल्याने सिल्लोडमध्ये सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.