CM Devendra Fadnavis | X @ANI

नागरिकांना 99 टक्के सरकारी सेवा मोबाईलद्वारे उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी गुरुवारी अधिकाऱ्यांना दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी सरकारी कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज कमी करून, ऑनलाइन प्रणालीद्वारे सरकारी सेवांचा लाभ नागरिकांनी घेतला पाहिजे यावर भर दिला. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह इतर कॅबिनेट आणि राज्यमंत्री उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राज्यातील विविध विभागांच्या ९६९ सेवा अधिसूचित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी आपले सरकार पोर्टल वर ५३६ सेवा उपलब्ध आहेत. ९० सेवा संबंधित विभागांच्या पोर्टल वर उपलब्ध आहेत. मात्र सुमारे ३४३ सेवा ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात. या सर्वच सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध करून द्याव्यात.

ज्या सेवा सध्या ऑफलाईन पद्धतीने दिल्या जातात त्या सर्व ऑनलाईन करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढाकार घ्यावा, असे त्यांनी नमूद केले. येत्या शंभर दिवसात हे काम पूर्ण करा. अनेक सेवा अधिसूचित करण्यात आलेल्या नाहीत, त्या सर्व सेवा अधिसूचित करण्यासाठी संबंधित मंत्री आणि सचिवांनी पुढाकार घ्यावा. नागरिकांना सुमारे ९९ टक्के शासकीय सेवा मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध झाल्या पाहिजेत. यामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले. (हेही वाचा: Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अंतर्गत जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार? मंत्री अदिती तटकरे यांनी दिली अपडेट)

राज्यात आपण ‘ईज ऑफ डूईंग बिझनेस’ संकल्पनेवर काम करण्यावर भर देत आहोत. त्यानुसार अधिकारांचे विकेंद्रीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. क्षेत्रीय स्तरावरील अधिकार शासनाकडे केंद्रीत केले जाऊ नये, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.