Maharashtra Jobs: कोरोना विषाणूच्या लॉकडाऊन दरम्यान महाराष्ट्र सरकारकडून 39,287 बेरोजगारांना रोजगार; जुलै महिन्यात तब्बल 21,572 लोकांना मिळाली नोकरी
प्रतिकात्मक फोटो (File Photo)

कोरोना विषाणू (Coronavirus) संकटाच्या काळामध्ये लॉक डाऊन (Lockdown) मुळे अनेकांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागला आहे. या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. या संकटामुळे बेरोजगारीचीही (Unemployment) समस्या निर्माण झाली आहे. अशात महाराष्ट्र सरकारने (Government of Maharashtra) लोकांना नोकऱ्या उपलब्ध करून देण्यासाठी काही योजना सुरु केल्या आहेत. आता कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे आणि महास्वयम वेबपोर्टलमार्फत एकट्या जुलै महिन्यात तब्बल 21,572 बेरोजगारांना रोजगार मिळवून दिला आहे.

त्याआधी एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात 17,715 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली. अशाप्रकारे लॉकडाऊनच्या काळात एकूण 39,287 बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. (हेही वाचा: कोरोना विषाणूमुळे जगातील पर्यटन क्षेत्राला पाच महिन्यांत 320 अब्ज डॉलर्सचे नुकसान; 12 कोटी नोकऱ्या धोक्यात- UN)

एप्रिल ते जूनअखेर या वेबपोर्टलवर 1,72,165 इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यापैकी सुमारे 17,715 जणांना रोजगार मिळाला. त्यानंतर जुलै महिन्यात 58,157 हजार बेरोजगारांनी रोजगारासाठी नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यासह कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते जून या 3 महिन्यात 24 ऑनलाईन रोजगार मेळावे झाले तर जुलै महिन्यात 31 मेळावे झाले.