Goa Assembly Elections: 'आमच्याशी युती केली नाही हे काँग्रेसचे दुर्दैव, आम्ही आगामी निवडणुकीत Shiv Sena-NCP ची ताकद दाखवून देऊ'- Sanjay Raut
Sanjay Raut | (Photo Credit: ANI)

गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Elections 2022) महाराष्ट्रातील महाविकास आघाडीसारखी आघाडी तयार होताना दिसत नाही. कॉंग्रेसने (Congress) शिवसेना व राष्ट्रवादीसोबत (Shiv Sena-NCP) युती करण्यास नकार दिला आहे. आम्ही युती करण्याचे प्रयत्न केले, मात्र निवडणुकीत स्वबळावर बहुमत मिळाल्यानंतर आपलेच सरकार स्थापन होईल, असे काँग्रेस नेत्यांना वाटत असल्याचे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी म्हटले आहे. गोव्यातील विधानसभेच्या 40 जागांसाठी 14 फेब्रुवारीला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 10 मार्च रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत काँग्रेसवर टीकास्त्र सोडत म्हणाले की, ‘राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना एकत्र येऊन गोव्यातही महाविकास आघाडी स्थापन करण्याचा प्रयत्न करत होते, मात्र काँग्रेसने त्यात फारसा रस दाखवला नाही. गोव्यात काँग्रेस एकट्याने सरकार स्थापन करेल असे त्यांना वाटते. महाविकास आघाडी पॅटर्नची पुनरावृत्ती करण्याचा आमचा प्रयत्न काँग्रेसने हाणून पडला आहे. त्यांनी आमच्याशी युती केली नाही हे काँग्रेसचे दुर्दैव आहे. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीची ताकद दाखवून देऊ. फक्त आमचाच पक्ष सत्तेवर येईल.’

संजय राऊत पुढे म्हणाले की, राज्यात काँग्रेसचा पाठिंबा मिळू शकला नसला तरी राष्ट्रवादीशी आमची चर्चा सुरू आहे. याबाबत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, ‘आम्ही काँग्रेसला गोव्याची निवडणूक एकत्रितपणे लढवण्याची ऑफर दिली होती, पण ती व्यर्थ ठरली. त्यांनी ना हो म्हटले ना नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्रपणे गोव्याची निवडणूक लढवतील, सर्व 40 जागा नाही, मात्र जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवली जाईल. उद्या पहिली यादी जाहीर केली जाऊ शकते आणि त्यानंतर इतर याद्या जाहीर केल्या जातील.’ (हेही वाचा: Nagar Panchayat Election 2022 Results: महाराष्ट्रातील 106 नगरपालिकांपैकी 97 पालिकांचे निकाल जाहीर, जाणून घ्या संपूर्ण आकडेवारी)

संजय राऊत राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या बैठकीत युती आणि निवडणुकीच्या फॉर्म्युल्याबाबत शिक्कामोर्तब होऊ शकते, असे मानले जात आहे. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी युतीबाबतचा निर्णय हायकमांड घेत असल्याचे म्हटले आहे. महाराष्ट्रात भाजपला रोखण्यासाठी सोनिया गांधींनी शिवसेना आणि राष्ट्रवादीला मदत केली. इतर राज्यात काँग्रेसची स्थिती चांगली आहे, त्यामुळे त्यांच्याशी (शिवसेना आणि राष्ट्रवादी) युती करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले आहेत.