Goa Assembly Polls 2022: आदित्य ठाकरे गोव्यात प्रचारासाठी उतरणार, शिवसेना उमेदवारांची यादी जाहीर; उत्पल पर्रिकर यांच्यासाठी उमेदवारी मागे घेण्याची संजय राऊत यांची घोषणा
Aditya Thackeray | (Photo Credits-Facebook)

गोवा विधानसभा निवडणुकीचा (Goa Assembly Election 2022) निकाल यावेळी वेगळा लागेल, असे सांगतानाच शिवसेना (Shiv Sena) उमेदवारांच्या प्रचारासाठी युवा नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) गोव्यात येतील अशी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय मंत्री दिवंगत मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे चिरंजीव उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) हे जर पणजी येथून निवडणूक लढवणार असतील तर शिवसेना आपला उमेदवार मागे घेईल आणि त्यांना पाठींबा देईल, असेही संजय राऊत यांनी सांगितले आहे. गोवा विधानसभा निवडणूक 2022 (Goa Assembly Election 2022) साठी शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीमध्ये नऊ उमेदवारांचा समावेश आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मतदारसंघनिहाय उमेदवारांच्या नावाची घोषणा केली. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते.

संजय राऊत यांनी या वेळी सांगितले की, शिवसेना गोव्यामध्ये 12 ते 13 जागांवर लढेल. उर्वरीत जागांवरील उमेदवारांची यादी आम्ही उद्या जाहीर करणार आहोत. या वेळी गोव्यात राजकीय चित्र वेगळे दिसेल. गोव्यातील घराणेशाही मोडीत काढण्यासाठी शिवसेना प्रयत्न करेल. त्यासाठी शिवसेनेने सामान्यातील सामान्य कार्यकर्त्याला तिकीट दिले आहे. या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुंबईतून शिवसेनेचे प्रमुख नेते गोव्यात येतील. आदित्य ठाकरे स्वत: प्रचारासाठी गोव्यात असतील. त्यासोबतच युवा सेनेचे नेतेही गोव्यात प्रचाराला येतील असे संजय राऊत म्हणाले. (हेही वाचा, Goa Assembly Elections: 'आमच्याशी युती केली नाही हे काँग्रेसचे दुर्दैव, आम्ही आगामी निवडणुकीत Shiv Sena-NCP ची ताकद दाखवून देऊ'- Sanjay Raut)

गोव्यामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढतील. गोव्यात विखुरलेला विरोधी पक्ष हीच भाजपची ताकद आहे. त्यामुळे महाराष्ट्राप्रमाणे आपण सर्वांणी एकत्र येऊया असे अवाहन आम्ही सर्व विरोधी पक्षांना केले होते. मात्र तसे घडले नाही. काँग्रेसनेही आमच्यासोबत यायला नकार दिला. तृणमूलचेही तसेच, मात्र, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी आणि ठाकरे कुटुंबीय, शिवसेना यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे गोव्यात जरी आम्ही एकमेकांविरोधात लढत असलो तरी, प्रचारादरम्यान आम्ही एकमेकांमध्ये कटूता निर्माण होईल, असे प्रसंग टाळू असेही संजय राऊत म्हणाले.