Mahad Gas Leak: रायगडच्या महाड एमआयडीसीमधील अमाईन्स लिमिटेड कंपनीत वायुगळती; 7 कामगार बाधित झाल्याची माहिती समोर
Gas Leak | Image used for representational purpose (Photo Credits: PTI)

रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड (Mahad) एमआयडीसीमधील (MIDC) अमाईन्स लिमिटेड कंपनीत (Amines) वायू गळती (Gas Leak) झाल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना गुरूवारी (21 जानेवारी) सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर आजूबाजुच्या परिसरात एकच खळबळ माजली आहे. दरम्यान, एच टू एस या मानवी आरोग्यास घातक असणाऱ्या वायुची गळती झाली आहे. ज्यामुळे 7 बाधित कामगारांना महाडमधील देशमुख रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वायु गळती थांबवण्यात आली असून वायुगळती नेमकी कशामुळे झाली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

उत्तम किसन पवार (वय 49, नागलवाडी) , तेजस विजय चाळके (वय 25, नाते), जयराम चंद्रकांत चौधरी (वय 25, वडघर), पंकज कुमार सोहम महतो (वय 20, बिहार), रजनीकांत नायर (वय 34, कवेअली), दत्तात्रय साहेबराव कोल्हे (वय 39, महाड), पप्पू कमल महातो (वय 30, बिहार) असे बाधित झालेल्या कामगारांची नावे आहेत. सध्या या कामगारांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस रुग्णालयात जाऊन बाधित कर्मचाऱ्यांकडे विचारपूस करत आहेत. हे देखील वाचा- Serum Institute Building Fire in Pune: सीरम इन्स्टिट्यूट इमारतीला आग, अग्निशमन दलाचे 10 बंब घटनास्थळी दाखल

यापूर्वीही या कारखान्यात अनेक अपघात घडले आहेत. ज्यामुळे अनेक कामगार जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या कारखान्यात सतत घडणाऱ्या अपघांतामुळे कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. कारखानदारांना राजकीय पाठबळ आहे. ज्यामुळे प्रदुषण नियंत्रण मंडळ कारखाना निरीक्षक यांच्याकडून कारावाई करण्यात कुचराई होते, अशा चर्चांना आता उधाण आले आहे.