दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा हस्तक कुख्यात एजाज लकडावाला याला पटना येथून अटक; मुंबई पोलिसांची मोठी कारवाई 
Ejaz Lakdawala arrested from Patna by Mumbai Police | (Photo Credits: Archieved, Edited)

दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याचा एकेकाळचा हस्तक कुख्यात एजाज लकडावाला (Ejaz Lakdawala) याला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी लकडावाला याला पटना येथून ताब्यात घेतले. मुंबई पोलीस (Mumbai Police) हे गेली अनेक वर्षे लकडावाला याच्या मागावर होते. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेशन शाखेने (Mumbai Police Anti Extortion Cell) त्याला गुरुवारी ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला 21 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

एजाज लकडावाला याच्यावर संघटीत गुन्हेगारी कायदा (MCOCA) सह इतरही 27 गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांकडे एजाज लकडावाला याच्याविरुद्ध तब्बल 80 तक्रारी दाखल झाल्या आहेत. लकडावाला हा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम याचा एकेकाळचा हस्तक होता. 1993 मध्ये मुंबईमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटानंतर एजाज लकडावाला हा छोटा राजन याच्यासोबत दाऊदपासून वेगळा झाला. दरम्यान, पुढे लकडावाला याने छोटा राजन याच्यापासूनही वेगळे होत आपली स्वतंत्र टोळी तयार केली. (हेही वाचा, भारताकडून दाऊद इब्राहीम याच्यासह पाकिस्तानलाही दणका; अमेरिकेने दिला पाठिंबा, केले कौतुक)

एएनआय ट्विट

मुंबई पोलीस गेली अनेक वर्षे एजाज लकडावाला याच्या शोधात होते. या आधी एजाज लकडावाला याच्या मुलीला पोलिसांनी अटक केली होती. ती बनावट पासपोर्ट वापरून प्रवास करत होती. मुंबई गुन्हे शाखेचे अतिरिक्त सीपी संतोष रस्तोगी यांनी सांगितले की, लकडावाला याच्या मुलीला मुंबई पोलिसांनी 28 डिसेंबर या दिवशी ताब्यात घेतले. मुलिकडे केलेल्या चौकशीनंतर पोलिसांना माहिती मिळाली की, लकडावाला हा पटना येथे येणार आहे. पटना येथे सापळा रचून मुंबई पोलिसांनी लकडावाला याला अटक केली.