Ganpati Special ST Bus: गणेशोत्सवासाठी 2200 ST Buses ची सोय; 'या' तारखेपासून बुकींगला सुरुवात
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही एसटीच्या (ST) विशेष बसेस (Buses) गणेशोत्सवासाठी सोडण्यात येणार आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या 2200 बसेस कोकणात सोडण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), पालघर (Palghar) येथील प्रमुख बसस्थानकातून या बसेस सुटणार आहेत. 4-10 सप्टेंबर दरम्यान या गाड्यांचा प्रवास सुरु राहील. त्यानंतर 14 सप्टेंबरपासून या बसेस परतीच्या प्रवासाला लागतील. या परतीच्या प्रवासासाठी बुकींग 16 जुलैपासून सुरु होणार आहे.

गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे वाहतुकीवर निर्बंध होते. मात्र यंदा कोरोनाचे नियम पाळत गणेशोत्सवासाठी विशेष बसेसची सोय करण्यात आली आहे. परंतु, प्रवासादरम्यान मास्क घालणे बंधनकारक असणार आहे. तसंच प्रवासापूर्वी बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. या गाड्यांच्या प्रवास सुरळीत व्हावा म्हणून कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथकं असणार आहेत. तसंच प्रवाशांसाठी तात्पुरत्या प्रसाधानगृहांची उभारणी करण्यात येणार आहे. (Ganpati Festival 2021 Special Trains: बाप्पा पावला! मध्य रेल्वेकडून गणेशोत्सवानिमित्त विशेष गाड्यांची घोषणा)

बसेससोबतच गणेशोत्सवासाठी विशेष ट्रेन्सची सोय देखील करण्यात आली आहे. यात मुंबई सीएसएमटी-सावंतवाडी-मुंबई सीएसएमटी, पनवेल-सावंतवाडी रोड-पनवेल, पनवेल-रत्नागिरी-पनवेल आणि मुंबई सीएसएमटी-रत्नागिरी-मुंबई सीएसएमटी या ट्रेन्सचा समावेश आहे. या विशेष ट्रेन्स संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी  www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या. एनटीईएस अॅपवरही तुम्हाला यासंदर्भात माहिती मिळू शकेल. त्याचबरोबर PRS आणि IRCTC च्या वेबसाईटवरुनही तुम्हाला बुकींग करता येईल.

दरम्यान, गणेशोत्सवासाठीच्या 72 ट्रेन्स फुल झाल्याने चाकरमान्यांसाठी अधिक गाड्या सोडण्याची मागणी भाजप आमदार आशिष शेलार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली आहे.