Ganesh Visarjan | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संसर्गाच्या छायेत आणि राज्य सरकारने घालून दिलेल्या नियम, अटी आणि सोशल डिस्टंन्सींग पाळत राज्यभरात गणेश विसर्जन (Ganesh Visarjan 2020) पार पडले. दरम्यान, सर्व खबरदारी घेऊनही गणेश विसर्जन (Ganesh Visarjan) करताना आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 16 ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. पुणे, जळगाव, नाशिक आणि अकोला या ठिकाणी एकूण 16 जण बुडाल्याचे वृत्त आहे. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला. तर तिघांचे प्राण वाचविण्यास मदत आणि बचाव पथक तसेच उपस्थित गणेशभक्तांना यश आले. दोघे जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.

प्राप्त माहितीनुसार पुणे येथे गणपती विसर्जनासाठी पाण्यात उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला आहे. कृष्णा मारुती लोकरे ( वय 18) असे या तरुणाचे नाव असल्याचे समजते.

दुसरी घटना जळगाव जिल्ह्यात घडली आहे. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथील तापी नदी पात्रात गणपती विसर्जन करण्यासाठी पाण्यात उतरलेले 5 तरुण पाण्यात बुडाले. त्यापैकी 3 जणांचे प्राण वाचविण्यात स्थानिकांना यश आले. तर उर्वरीत 2 जण अद्यापही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध सुरु आहे.

नाशिक जिल्ह्यातही गणपती विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. नाशीक येथे गणपती विसर्जनात गेलेल्या 5 तरुणांचा मृत्यू झाला आहे. या पाचपैकी चार जण गणपती विसर्जनासाठी नदीत उतरले होते. तर आणखी एक जण विहीरीत उतरला होता. आणखी एक तरुण तर सेल्फी घेत असताना पाण्यात बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यात मृत्यू झालेल्या तरुणांची नाव पुढील प्रमाणे- नरेश नागेश कोळी या युवकाचा,देवळाली गावात,वालदेवी नदीत मृत्यू, अजिंक्य राजाराम गायधनी या युवकाचा संगमावर,दारणा नदीत मृत्यू, प्रशांत वसंत गुंजाळ या युवकाचा,देवळा गावात,विहिरीत विसर्जन करताना बुडून मृत्यू, रवींद्र रामदास मोरे या युवकाचा,पिंपळगाव बसवंतला कादवा याचा नदीत बुडून मृत्यू झाला. (हेही वाचा, Ganesh Visarjan 2020: मुंबईतील केवळ 'या' मंडळांच्या गणेश मूर्तींचे समुद्रात होणार विसर्जन, वाचा सविस्तर)

अशीच दुर्घटना अकोला येथेही घडली असून, गणपती विसर्जन करत असताना दोन भावांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. हे दोन्ही तरुण अकोला शहात असलेल्या बाळापूर येथील राहणारे असल्याचे समजते.

गणपती विसर्जन करताना पाण्यात बुडून मृत्यू होण्याच्या घटना दरवर्षीच घडत असतात. राज्य सरकार, पोलीस दल आणि सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, संघटना यांनी सावधानतेचा इशारा दिलेला असताना आणि जनजागृती केलेली असतानाही, दरवर्षीच अशा घटना घडताना दिसतात.