CM Uddhav Thackeray (Photo Credits: Twitter)

कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळांनी (Ganesh Mandals) गावातला गणेशोत्सव सुरक्षितरित्या आणि आरोग्याचे कोणतेही विघ्न येऊ न देता पार पाडावा, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी केलं आहे. आज ठाकरे यांनी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी यांच्याकडून कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा घेतला.

गणेशोत्सव काळात नागरिकांची होणारी ये-जा पाहता प्रशासनाने पुरेपूर काळजी घ्यावी आणि दक्ष राहावे अशा सूचनादेखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केल्या. गणेशोत्सवात मुंबई भागातून काही लाख नागरिक विशेषत: रत्नागिरी, सिंधुदुर्गात आपापल्या परंपरागत घरी जाऊन उत्सव साजरा करतात. सध्या कोरोनाचा संसर्ग शहरी भागात जास्त दिसत असला तरी ग्रामीण भागातही तो दिसू लागला आहे. मुंबईजवळच्या रायगड जिल्ह्यात तो वाढत आहे. त्या तुलनेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथे अजूनही त्याचा प्रादुर्भाव नसला तरी काळजी घेणं आवश्यक असल्याचंही ठाकरे यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा -  आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून मिळणार वाढीव मोबदल्याचा लाभ; राजेश टोपे यांची माहिती)

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सवासाठी राज्य सरकारच्या गृह विभागाने मार्गदर्शक तत्वे घालून दिली आहेत. या सर्व मार्गदर्शक तत्वांचे कटाक्षाने पालन करावे. मुंबईत आपण मोठ्या गणेश मंडळांशी बोलून त्यांच्या एकमताने यंदाचा उत्सव साजरा करण्याबाबत काही नियम ठरविले आहेत. कोकणातदेखील त्याचे पालन होणे गरजेचे आहे. प्रशासनाने या काळात चेक पोस्ट अधिक सतर्क करावेत. त्यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त, आरोग्य कर्मचारी राहतील याची काळजी घ्यावी, अशा सूचनादेखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी केल्या.

याशिवाय रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी चाचणी प्रयोगशाळा सुरु झाली आहे. रायगडमध्ये लवकरचं ती कार्यान्वित होईल. त्यांच्या क्षमता वाढवता येतात का ते पाहण्याच्या तसेच या जिल्ह्यांमध्ये आयसोलेशन बेड्स तसेच इतर वैद्यकीय सुविधा तातडीने वाढवाव्यात, रुग्णवाहिका पुरेशा राहतील हे पाहावे जेणे करून गणेशोत्सवापर्यंत वैद्यकीय तयारी राहील, असे ही मुख्यमंत्री म्हणाले.