आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून मिळणार वाढीव मोबदल्याचा लाभ; राजेश टोपे यांची माहिती
Rajesh Tope (Photo Credits: Twitter)

राज्य सरकारने राज्यातील आशा स्वयंसेविकांना (Asha Volunteers) 1 जुलैपासून वाढीव मोबदल्याचा लाभ मिळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सरकारच्या या निर्णयामुळे आशा स्वयंसेविकांना दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागातील आरोग्य विभागाचा कणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काही दिवसांपूर्वी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात आज आरोग्य विभागाने शासन निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार हा वाढीव मोबदला येत्या 1 जुलैपासून मिळणार असल्याचे शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ करण्यासाठी पुढाकार घेतला होता. सध्या ग्रामीण भागात आशा स्वयंसेविका 74 प्रकारचे विविध कामे करतात. त्यांना कामानुसार मोबदला मिळतो. परंतु, राज्य शासनाकडून 2 हजार रुपये कायमस्वरूपी मानधन देण्याचा निर्णय 25 जून रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. यासंदर्भात राजेश टोपे यांनी भूमिका मांडली होती. (हेही वाचा - Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात आज 8,308 नवे कोरोना रुग्ण, तर 258 जणांचा मृत्यू; राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या 2,92,589 वर पोहचली)

दरम्यान, आरोग्य विभागाने जाहीर केलेल्या शासन निर्णयानुसार, आशा स्वयंसेविकांना केंद्र शासनाकडून नियमित 4 कामांसाठी प्राप्त होणाऱ्या मोबदल्याच्या समप्रमाणात कमाल 2 हजार रुपयांपर्यंत दरमहा तसेच गटप्रवर्तकांना दरमहा 3 हजार रुपये राज्य शासनाच्या निधीतून देण्यात येणार आहेत. आरोग्य विभागाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.