Death/ Murder Representative Image Pixabay

गडचिरोली (Gadchiroli) मध्ये आज (14 मे ) एका 65 वर्षीय महिलेचा वाघाच्या झडपेमध्ये मृत्यू झाला आहे. पार्वताबाई बालाजी पाल असं या मृत महिलेचं नाव आहे. सकाळी जंगलामध्ये तेंदूपानं तोडायला गेली असताना तिच्यावर वाघाने झडप घातली आणि त्यामध्ये तिचा जीव गेला. ही घटना सकाळी 6-6.30 च्या सुमारास गडचिरोलीच्या सावरगाव (Savargaon) जंगलामधील आहे.

पर्वताबाई आपल्या 3 महिला सहकार्‍यांसोबत सावरगावच्या जंगलामध्ये तेंदूपानं गोळा करण्यासाठी आल्या होत्या. तेव्हा जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. पार्वताबाईंना घेऊन तो जंगलात गेला. पर्वताबाईंसोबत आलेल्या महिलेने आरडाओरड केल्यानंतर बाकी मजूरही आले पण तो पर्यंत वाघाच्या हल्ल्यात पार्वताबाईंचा जीव गेला होता.

चातगाव वनपरिक्षेत्रात सावरगाव येते. या घटनेनंतर वन विभागाचे कर्मचारी तेथे आले होते. आता जंगलात येणार्‍यांमध्ये, आजुबाजूच्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. दरम्यान पार्वता बाईंच्या घरी त्यांचे पती, विवाहित मुलगी, सून व नातवंडे असतात.