आज, 8 मार्च रोजी जगभरातील अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day) साजरा केला जातो. भारतामध्येही मोठ्या उत्साहाने हा दिन साजरा होत आहे. आता या दिनाचे औचित्य साधत पुणे (Pune) शहरातील महिला आणि मुलींना एक विशेष सेवा देत, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ने महिन्याच्या प्रत्येक 8 तारखेला महिलांसाठी संपूर्ण दिवस मोफत बस सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सुविधा महिला दिनापासून म्हणजेच 8 मार्च 2023 पासून तेजस्विनी बसद्वारे उपलब्ध होईल.
तेजस्विनी बस ही 8 मार्च 2018 रोजी सादर केली गेली होती. मात्र या बससेवेला प्रतिसाद न मिळाल्याने, कोविड-19 काळात ती बंद करण्यात आली. नंतर ही सेवा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता महिला दिनानिमित्त पीएमपीएमएल महिला प्रवाशांना या बसद्वारे शहरात मोफत प्रवास सेवा देणार आहे. तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात येत आहे.
पीएमपीएमएलतर्फे प्रत्येक महिन्याच्या ८ तारखेस ‘तेजस्विनी’ बस मधून मोफत प्रवास सेवा दि. ८ मार्च २०२३ पासून पूर्ववत करण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तेजस्विनी बसेस मधून महिलांनी मोफत प्रवास करण्याचे आवाहन पीएमपीएमएलकडून करण्यात येत आहे. #womensday #pmpml pic.twitter.com/Cx4cGDjHHk
— Pune Mahanagar Parivahan Mahamandal Ltd (@PMPMLPune) March 4, 2023
आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय कामगिरीचा उत्सव साजरा करणारा जागतिक दिवस आहे. आजच्या दिवशी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले जातात. मीरा भाईंदर-म्युनिसिपल कॉर्पोरेशन (MBMC) च्या सार्वजनिक वाहतूक युनिटने देखील 8 मार्च, आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त महिलांना मोफत प्रवासाची ऑफर दिली आहे. प्रत्येक महिन्याच्या 8 तारखेला महिलांना मोफत बससेवा उपलब्ध करून देण्याचा विचार नागरी संस्था करत आहे. (हेही वाचा: Maharashtra Economic Survey 2022-23: आर्थिक सर्वेक्षण अहवाल जाहीर, राज्याचा विकास दर 6.8%; उद्या अर्थसंकल्प)
दरम्यान, महिलांनी स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो. दिनांक 28 फेब्रुवारी 1909 रोजी, न्यू यॉर्क येथे पहिला महिला दिन साजरा करण्यात आला होता. पुढे 1910 च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषेदत मांडलेल्या सुचनेनुसार, 8 मार्च हा दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून निश्चित करण्यात आला.