प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-संग्रहित, संपादीत प्रतिमा)

संपूर्ण कोकण आणि महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या शिवसेना आमदार परशुराम उपरकर (Former Shiv Sena MLA Parshuram Uparkar)  हल्ला प्रकरणाचा तब्बल 8 वर्षांनंतर निकाल लागला. या प्रकरणात कणकवली शहर विद्यमान नगराध्यक्ष समीर नलावडे (Sameer Nalawade) आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत ( Sandesh Sawant) या दोघांना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने हा निकाल गुरुवारी सायंकाळी दिला. जिल्हा व सत्र न्यायाधीश प्रकाश कदम यांनी हा निर्णय दिला. दरम्यान, या खटल्यात असलेल्या उर्वरीत 44 आरोपींची मात्र निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. डिसेंबर 2011 मध्ये वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीवेळी आठ वर्षांपूर्वी हा हल्ला झाला होता.

काय आहे प्रकरण?

डिसेंबर 2019 मध्ये वेंगुर्ला नगरपरिषद निवडणूक सुरु होती. शिवसेना आणि नारायण राणे समर्थक यांच्यात जोरदार संघर्ष सुरु होता. दरम्यान, या संघर्षातून निर्माण झालेल्या वादातून नारायण राणे समर्थक जमावाने वेंगुर्ला सुंदर भाटले परिसरात असलेल्या शिवसना शाखा कार्यालयावर जोरदार हल्ला चढवला. या वेळी कार्यालय इमारतीवर काचेच्या बाटल्या व दगडफेक करत गाड्यांची तोडफोड करण्यात आली. दरम्यान, या वेळी शाखा कार्यालयात बसलेले शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्यावरही प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. (हेही वाचा, शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय नारायण राणे यांच्या पक्षाचं विलिनीकरण करणार नाही – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस)

शिवसेना आमदार परशुराम उपरकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी संजय पडते, काका कुडाळकर, समीर नलावडे, संदेश सावंत, संजू परब यांच्यासह ४७ जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात गेली सहा वर्षे हा खटला सुरु होता. अखेर या खटल्याचा गुरुवारी (6 सप्टेंबर 2019) सायंकाळी निकाल लागला.