Sharad Patil | (File Image)

मिरज विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रा. शरद पाटील यांचे निधन (Former MLA Prof Sharad Patil Passes Away) झाले आहे. ते 55 वर्षांचे होते. ते पुणे पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेवरही आमदार राहिले होते. सांगली आणि पश्चिम महराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक वर्तुळात त्यांनी भरीव योगदान दिले होते. खास करुन चळवळ आणि तरुणांमध्ये ते लोकप्रिय होते. पाठिमागील काही काळापासून त्यांना प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास होता. त्यांच्या निधनाने त्यांचे निकटवर्तीयांना धक्का बसला आहे.

प्रकाश जावडेकर यांना पराभूत करुन ठरले जायंट किलर

प्रा. शरद पाटील यांनी एकदा विधानसभा आणि एकदा विधानपरिषद अशा दोन्ही सभागृहात आमदारकी मिळवली. पहिल्या खेपेस ते मिरज विधानसभा मतदारसंघातून निवडून गेले. ते सलग 1990 आणि 1995 असे दोन वेळ विधानसभेवर आमदार राहिले. त्यानंतर पुणे पदवीधर मतदारसंघासाठी सन 2002 मध्ये झालेल्या निवडणुकीत ते जायंट किलर ठरले. त्यांनी भाजपचे तत्कालीन उमेदवार आणि विद्यमान केंद्रीय मंत्री, नेते प्रकाश जावडेकर यांचा दणदणीत पराभव केला. या पराभवामुळे ते राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेत आले. त्यांचा हा विजय जायंट किलर म्हणून ओळखला गेला. (हेही वाचा, Rashid Shaikh Passes Away: माजी आमदार शेख रशीद यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन)

जेडी (एस) पक्षाचे माजी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष

माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या  जनता दल (धर्मनिरपेक्ष) (Janata Dal (Secular) पक्षाचे ते सक्रीय कार्यकर्ते होते. इतकेच नव्हे तर या पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी प्रदीर्घ काळ काम केले. शरद पाटील यांना समाजकार्य आणि राजकीय वारसा घरातूनच मिळाला. त्यांचे वडील आर. पी. अण्णा पाटील हे देशभक्त म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे घरातूनच मिळालेला राजकीय आणि सामाजिक कार्याचा वसा त्यांनी आपल्या कामातून जपला. त्यांनी मिरज येथील यशवंत शिक्षण संस्थेचे प्रमूख म्हणूनही काम पाहिले. मात्र, प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाठिमागील काही काळापासून ते समाजसेवा आणि जाहीर कार्यक्रमांपासून दूर होते.

हृदयविकाराचा झटका आल्याने मृत्यू

पाठिमागील काही दिवसांपासून वैद्यकीय उपचार सुरु असलेल्या प्रा. पाटील यांना कालच (मंगळवार, 26 डिसेंबर) घरी आणण्यात आले होते. दरम्यान, मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. सांगली येथील कुपवाड परिसरातील स्मशानभूमीत दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या जाण्याने सांगलीतील समाजिक, शैक्षणिक वर्तुळात हळहळ व्यक्त होते आहे.