नाशिक जिल्ह्यातील मालेगाव शहरातील महेश नगर येथे राहणाऱ्या माजी नगरसेवकाच्या घरावर रात्रीच्या सुमारास 2 अज्ञात तरुणांनी गोळीबार (Firing) केला. विशेष म्हणजे या अज्ञात माथेफेरूनी नगरसेवकाच्या निवासस्थाच्या चारही बाजूंनी गोळीबार केला. सुदैवाने यात नगरसेवक आणि त्यांचे कुटुंबिय बचावले आहे. रिजवान खान, (Rizwan Khan) असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. या हल्ल्यामुळे मालेगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी रिजवान खान यांच्या फिर्यादीनुसार, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव शहरातील महेश नगर येथे माजी नगरसेवक रिजवान खान याचे निवासस्थान आहे. दरम्यान, गुरुवारी रात्री 2 वाजता अज्ञात व्यक्तीने त्यांच्या घराची बेल वाजवली. त्यानंतर अज्ञात माथेफिरूनी रिजवान यांना ऐकेरी नावाने हाक मारत दरवाजा उघडण्यास सांगितले. मात्र, त्यांची पत्नी समीना कौसर यांनी रिजवान यांना दार उघडून दिले नाही. त्यांनी खिडकीच्या बाहेर डोकावून पाहिले असता त्यांना दोन अज्ञान तरुण हातात बंदुक घेऊन उभे असलेले दिसले. त्यामुळे रिजवान यांच्या कुटुंबियांनी बंगल्याच्या मागच्या खोलीत धाव घेतली. (हेही वाचा - मुंबई: मध्य रेल्वे ही अनोख्या अंदाजात साजरा करणार मराठी भाषा दिन, मराठमोळ्या कविता, अभिमान गीत दुमदुमणार)
हल्लेखोरांनी रिजवान यांच्या बंगल्याच्या चारही बाजून फायरिंग केली. त्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत रिजवान यांनी समोर राहत असलेल्या जनता दलाचे सचिव आणि नगरसेवक मोहंमद मुस्तकिम तसेच पत्रकार जहुर खान यांना फोन केला. त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यांनी लागलीच पोलिसांना आणि अग्निशमन दलाला यासंदर्भात माहीती दिली. त्यानंतर अग्नीशामक दलाच्या जवानांनी सायरण वाजविल्याने हल्लेखोरांनी रिजवान यांच्या घरापासून पळ काढला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.