Marathi Rajbhasha Din 2020: मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत आज मुंबई सह महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. दरम्यान आज (27 फेब्रुवारी) मुंबई लाईफ लाईन असणार्या मुंबई लोकल (Mumbai Local) आणि रेल्वे स्थानकांमध्येही मराठीचा जागर ऐकायला मिळणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, आज मराठी राजभाषा दिनाचं औचित्य साधत मध्य रेल्वेच्या (Central Railway) उद्घोषणा यंत्रणेतून मराठी राजभाषा दिनाच्या शुभेच्छा (Marathi Rajbhasha Din) संदेश सोबत मराठी गीते, कविता वाजवून आजचा मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान रेल्वेच्या संबंधित विभागाला तशा सूचनाहीदेखील देण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. आज रेल्वे सोबतच महामंडळाच्या एसटी बसमध्ये, बस स्थानकांमध्ये मराठी गाणी, कविता, अभिमान गीतं वाजवली जाणार आहेत. त्याच्या माध्यमातून आज मराठी भाषा दिन साजरा केला जाईल. Marathi Bhasha Din 2020: भारतामधील प्रमुख 22 भाषांपैकी एक असणार्या मराठी भाषेचंं देशातील आणि जगातील स्थान कितवं?
मराठी साहित्य विश्वात वि. स. खांडेकर यांच्यानंतर ज्ञानपीठ हा प्रतिष्ठीत पुरस्कार मिळवणारे कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन साजरा करतात. या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. दरम्यान आज विधिमंडळामध्येदेखील मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. सोबतच आज सार्या शिक्षण मंडळांमध्ये मराठी भाषा सक्तीची करण्याचं विधेयक मांडलं जाणार आहे.
मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकसंख्येनुसार मराठी ही जगातील 10 वी तर भारतातील 3 री भाषा आहे. 2011 च्या जनगणनेनुसार, मराठी बोलणाऱ्यांची लोकसंख्या सुमारे 9 कोटी आहे. आज जगभरात पसरलेल्या मराठी बांधवांसाठी खास दिवस आहे. जगाच्या विविध कोपर्यामध्ये मराठी भाषा दिनाचं औचित्य साधत त्याचं सेलिब्रेशन करण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.