अनिल पाटील आणि देवेंद्र फडणवीस (संग्रहित संपादित प्रतिमा)

यावर्षी अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची परिस्थितीत फार गंभीर झाली आहे. शेतकऱ्यांचे असेच हाल गेल्या काही वर्षापासून होत आहे. मात्र मावळत्या फडणवीस सरकारने (Devendra Fadanvis Government) याची अपेक्षित दखल घेतली नाही. याच रागातून सोलापूरच्या (Solapur) एका शेतकऱ्याने फडणवीस सरकार पडावे व ते पुन्हा सत्तेत येऊ नये म्हणून तुळजापूरच्या भवानीकडे नवस केला होता. अनिल पाटील असे या शेतकऱ्याचे नाव असून, जोपर्यंत फडणवीस सरकार पडत नाही तोपर्यंत आपण अनवाणी फिरू असा हा नवस आहे. आता परिस्थिती बदलली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला असून, उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळे परवा हा शेतकरी आपला नवस फेडणार आहे. सामनाने याबाबत वृत्त दिले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ तालुक्यातील शिरपूर येथील हा शेतकरी आहे. आपल्या नवसाबद्दल माहिती देताना अनिल म्हणतात, 'महाराष्ट्रात 2015-16 रोजी दुष्काळी परिस्थितीत होती. शेतकऱ्यांची परिस्थितीत प्रचंड खराब होती. त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी यांना भेटून आमची परिस्थिती सांगितली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही पत्रे लिहून याची माहिती दिली, मात्र त्यांनी त्याची कोणतीही दखल घेतली नाही. सोलापूर जिल्ह्यात चारा छावण्या सुरु कराव्यात अशी आमची मागणी होती. यासाठी मी आत्मदहनाचा इशाराही दिला मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही. (हेही वाचा: 80 वर्षीय शरद पवारांच्या चाणक्यनीती ने 'असे' बदलले महाराष्ट्रात सत्ता समीकरण; देवेंद्र फडणवीसांसह संपूर्ण भाजपला केले नेस्तनाभूत)

त्यानंतर 13 ऑक्टोबर 2016 रोजी फडणवीस सरकार पुन्हा येऊ नये व आहे ते सरकार पडावे यासाठी मी अनवाणी फिरेन असा नवस अनिल यांनी आई तुळजाभवानीला केला. जर असे झाले तर दंडवत घालत मी तुझा नवस फेडायला येईन असेही अनिल म्हणाले होते. त्यामुळे गेले तीन वर्षे अनिल यांनी पायात चप्पल घातली नाही. अखेर भवानीमातेने अनिल यांचा नवस पूर्ण केला आहे. त्यामुळे उद्या उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यावर 29 नोव्हेंबरला अनिल तुळजापूरला जाऊन आपला नवस फेडणार आहेत. त्यानंतरच ते पायात चप्पल घालतील.