Flashback 26 July 2005: मुंबई कधी झोपत नसते. कधी थांबत नसते. ती सुरुच असते अव्याहतपणे. मुंबईकरांमध्ये नेहमीच असते एक स्पिरीट. जे करतं कोणत्याही प्रसंगाला जातं धाडसानं सामोरे. कारण मुंबईकरांकडे असतो एकापेक्षा एक भयानक अशा प्रसंगांचा आणि त्याला धिराने तोंड दिल्याचा अनुभव. काल आणि आज (1,2 जुलै 2019) पडलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना झाली. रेल्वे, रस्ते अशी सर्वच वाहतूक ठप्प झाली. रस्तोरस्ती आणि मुख्य शहरासह अनेक भागात पाणी साचले. त्यामुळे कधीही न थांबणारी मुंबई थांबल्याचे चित्र तयार झाले. पण, असे होण्याची ही पहिलीच वेळ नाही. मुंबईकरांनी याही आधी काही वर्षे याहीपेक्षा भयानक पाऊस पाहिला आहे. तो दिवस होता 26 जुलै 2005. या दिवशी मुंबईत भयंकर पर्जन्यवृष्टी झाली. काल आणि आज झालेल्या पावसाने पुन्हा एकदा मुंबईकरांच्या मनात त्या दिवसाच्या आठवणी जाग्या केल्या. जाणून घ्या त्या दिवशी मुंबईत किती पाऊस पडला होता. त्या पावसाने नागरिकांना किती आणि कसा फटका बसला होता यावर टाकलेला हा एक कटाक्ष.
25 वर्षातील सर्वाधिक पाऊस
मुंबईकरांनी 26 जुलै 2005 मध्ये भयावह पावसाची अनुभुती घेतली. 2005 मध्ये मुंबईत तब्बल 944 मिली इतक्या पावासाची नोंद झाली होती. पण, त्याही आधी बरोबर 25 वर्षांपूर्वीही मुंबईकरांनी अशाच प्रकारच्या पावसाची अनुभुती घेतली होती. तो दिवस होता 5 जुलै 1974. त्या दिवशी मुंबईत 375 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. (हेही वाचा, मुंबईकरांसाठी पश्चिम रेल्वे कडून 'हेल्पलाईन नंबर्स' जारी; मह्त्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मिळवा लोकल ट्रेनचे अपडेट्स)
26 जुलैच्या पावसाने मुंबईत हाहाकार
26 जुलै 2005 रोजी मुंबईत झालेल्या पावसाने मुंबईत हाहाकार उडाला. शेकडो लोकांचे जीव गेले. सुमारे 14 हजार घरं उदध्वस्त झाली. अवघ्या 24 तासांमध्ये मुंबईत त्या दिवशी तब्बल 944 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. गेल्या 100 वर्षांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर झालेली पावसाची ही पहिलीच नोंद होती. या पावसाने 37 हजार रिक्षा, 4000 टॅक्सी आणि 900 बेस्ट बसेसचं नुकसान झालं. तर असंख्य वाहनं पाण्यात अडकली. एका अकडेवारीनुसार त्या पावसाने मुंबईत 5.5 बिलियन इतक्या मालमत्तेचं नुकसान झालं.