खुशखबर! मच्छिमारांच्या मुलांना तटरक्षक दलात समाविष्ट करण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया, तटरक्षक दलाकडून घोषणा
Arabian Sea | (File Photo)

ज्यांचे पोट हे समुद्रातील मासेमारी व्यवसायावर अवलंबून असते, त्या मच्छिमारांना तसेच त्यांच्या मुलांना समुद्राची व किनारपट्टीची विशेष जाण असते. अशा होतकरु तरुणांची भारतीय तटरक्षक दलात (Indian Coast Guard)  विशेष गरज आहे. म्हणूनच मच्छिमारी करणा-या मुलांना तटरक्षक दलात समाविष्ट करण्यासाठी विशेष भरती प्रक्रिया राबवली जाईल, अशी घोषणा दलाकडून करण्यात आली आहे. मटा ने दिलेल्या वृत्तानुसार, समुद्रात मासेमारी करणा-या मुलांना समुद्राच्या पाण्याचा अंदाज आणि इतर हालचाली यांबाबत इत्यंभूत माहिती असते. त्यामुळे अशा तरुणांना तटरक्षक दला संधी देणार असल्याचे तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर व्ही.डी.चाफेकर यांनी सांगितले. 30 सप्टेंबरला वरळी भागातील दलाकडून विशेष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यात त्यांनी मच्छिमारांशी संवाद साधला.

तटरक्षक दलाच्या पश्चिम विभागाचे कमांडर व्ही. डी. चाफेकर यांनी सागरी संरक्षण व समुद्री सुरक्षा याबाबत मार्गदर्शन केले. 'समुद्राची व किनारपट्टीची सर्वाधिक जाण मच्छिमारांना असते. यामुळे त्यांच्या तरुण मुलांनी तटरक्षक दलात यावे. ही त्यांच्यासाठी करिअरची आगळी संधी असेल,' असे आवाहन चाफेकर यांनी केले. हेही वाचा- कुशाग्रबुद्धी आणि सौंदर्यासाठी भरपूर मासे खा!

26/11च्या हल्ल्यानंतर किनारपट्टी सुरक्षेसाठी तटरक्षक दलाकडून विविध कार्यक्रम राबविले जातात. मच्छिमार बांधवांशी चर्चा हा त्यातील सर्वात मोठा व महत्त्वाचा कार्यक्रम आहे. याअंतर्गत मच्छिमारांमध्ये समुद्री घुसखोरी, बाहेरील नौका ओळखणे, संशयास्पद हालचाली ओळखणे तसेच या सर्वांची वेळोवेळी सुरक्षा दलांना माहिती देणे याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच त्यादृष्टीने प्रशिक्षणही दिले जाते. असाच कार्यक्रम सोमवारी तटरक्षक दलाने वरळी किनारपट्टीवर घेतला.

समुद्राचा अंदाज घेणे हे खूप अवघड आणि जोखमीचे काम आहे. खोल समुद्रात आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास काय करावे याबाबत प्रशिक्षणही या मेळाव्यात देण्यात आले.