ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारासाठी (Cabinet Extension) आज सिल्व्हर ओक (Silver Oak) येथे राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रावादी पक्षाच्या काही मंत्र्याची नावं निश्चित करण्यात आली. सोमवारी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. परंतु, अद्याप गृहखात कुणाकडे असेल याबाबत सस्पेन्स कायम आहे. ही बैठक संपल्यानंतर अर्थमंत्री जयंत पाटील (Finance Minister Jayant Patil) यांनी पत्रकारांशी बोलताना 'मंत्रिमंडळ विस्तारानंतरच गृहखातं कुणाकडे हे कळेल,' असं सांगितलं. दरम्यान, या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार, प्रफुल्ल पटेल आदी नेते उपस्थित होते. सिल्व्हर ओकवर झालेल्या बैठकीत उपमुख्यमंत्री आणि गृहखात्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. सोमवारी ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळाचा अखेरचा विस्तार होणार आहे.
यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या नेत्यांचा समावेश असणार आहे. ही बैठक पार पडल्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले की, 'सध्या 6 मंत्र्याकडे देण्यात आलेली खाती तात्पुरत्या स्वरूपाची आहे. मुख्यमंत्र्यांच्या निर्णयानुसार, मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप करण्यात येणार आहे. गृहखातं कुणाकडे असेल हे मंत्रिमंडळ विस्तारानंतरचं कळेल,' असंही पाटील यांनी यावेळी सांगितलं. (हेही वाचा - मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त अखेर ठरला; महाविकास आघाडीच्या संभाव्य मंत्र्यांची नावे फुटली?)
उपमुख्यमंत्री तसेच गृहखातं या दोन वजनदार खात्यावर कोणाची वर्णी लागणार हे अद्याप अस्पष्ट आहे. परंतु, ठाकरे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार यांचेही नावं आहे. त्यामुळे या दोन वजनदार पदापैकी एकावर अजित पवार यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.