Result | Representational Image (Photo Credits: gettyimages)

कोरोना विषाणूने संपूर्ण महाराष्ट्राला हादरून सोडले आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे . यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray) यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. दरम्यान त्यांनी अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा केली आहे. तसेच विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षाबाबतही (Final Year Exams 2020) त्यांनी मोठी घोषणा केली आहे. राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षेचे काय करायचे? हा प्रश्न अजूनही प्रलंबितच होता. अनेकांनी या परीक्षा रद्द करण्याचा पर्याय सुचवला होता. राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव देखील केंद्राला पाठवला होता. मात्र, त्यावर पुन्हा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आक्षेप घेत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या जायला हव्यात, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर राज्य सरकारने माघार घेत राज्यपालांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका घेतली होती.

दरम्यान, उद्धव ठाकरे म्हणाले की, अंतिम वर्षातील परिक्षेबाबत शनिवारी बैठक पार पडली होती. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तात्काळ परिक्षा घेणे योग्य नाही. यामुळे विद्यापीठाच्या अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या परिक्षा रद्द करण्यात येते आहेत. विद्यार्थ्यांना अंतिम वर्षाच्या परिक्षा घेण्यापूर्वी जेवढे सेमिस्टर झाले आहेत, त्याच्या सरासरी मार्कावरून निकाल देण्यात येणार आहे. महत्वाचे म्हणजे, ज्या विद्यार्थ्यांना अधिक गुण मिळवण्याची इच्छा असेल, त्यांना परिस्थिती पाहून नंतर परिक्षा देता येईल अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच आमचे सरकार शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. हे देखील वाचा- कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी 4 हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडून ठोस पाऊले उचलली जात आहेत. यातच कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने शनिवारी लॉकडाउन 5.0 ची घोषणा केली होती. दरम्यान, या काळात कोणत्या प्रकारची सूट देण्यात येईल, हे केंद्र सरकार कडून जाहिर करण्यात आले होते. त्यानंतर आज महाराष्ट्र सरकारने लॉकडाउन 5.0 बाबत नियमावली जाहीर केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला आहे. तसेच या लॉकडाउनमध्ये काय सुरु राहणार? काय बंद राहणार याबाबत त्यांनी चर्चा केली आहे.