कोरोना रुग्णांच्या वैद्यकीय सेवेसाठी 4 हजार डॉक्टर्स तातडीने उपलब्ध करून देणार - वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख
Medical Education Minister Amit Deshmukh (PC - Facebook)

राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांमधून फेब्रुवारी 2019 मध्ये एम. बी. बी. एस. परीक्षा उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या आणि इंटर्नशिप पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना तात्पुरते पदवी प्रमाणपत्र देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख (Amit Deshmukh) यांनी दिले आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे एम.बी.बी.एस. उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडे नोंदणी करता येणार आहे. तसेच यामुळे तब्बल 4 हजार डॉक्टर्स कोरोनाजन्य परिस्थितीत वैद्यकीय सेवा देण्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान, राज्य सरकारच्या या निर्णयानंतर इंटर्नशिप पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना तातडीने तात्पुरती पदवी प्रमाणपत्रे देण्यात यावीत, अशा सूचना अमित देशमुख यांनी महाराष्ट्र विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या आहेत. वैद्यकीय शिक्षण सचिव डॉ. संजय मुखर्जी आणि वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी या डॉक्टरांच्या सेवा वैद्यकीय शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या रुग्णालयांमध्ये घेण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्रात शॉपिंग मॉल, हॉटेल्स, सलून, ब्युटी पार्लर राहणार बंद; राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी)

राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरांची कमतरता भासत आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे वैद्यकीय सेवेसाठी मोठ्या प्रमाणात डॉक्टर्स उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सध्या सेवेत असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे.

याशिवाय करोनाग्रस्तांवर उपचारांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची वाढती गरज लक्षात घेऊन, बृहन्मुंबई महानगर पालिका क्षेत्रात मानधन तत्वावर डॉक्टर आणि परिचारिकांना सेवेत घ्यावं, असे निर्देशही अमित देशमुख यांनी दिले आहेत. याअंतर्गत नोंदणीकृत आणि इंटर्नशीप पूर्ण केलेल्या 45 वर्षाच्या आतले विविध तज्ञ डॉक्टर आणि परिचारिकांना सेवेत घेतलं जाणार आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावे लागणार आहेत.