समुद्राच्या आलेल्या उधाणामुळे पिकांचे झालेली नुकसानभरपाई आत सरकारकडून मिळणार आहे. राज्याचे खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते यांनी अशा प्रकारची मदत मिळावी म्हणून मागणी केली होती, कालच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार खारभूमी विकासमंत्री दिवाकर रावते व वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश असलेल्या या उपसमितीने अशा प्रकारची मदत देण्याचा निर्नाघ घेतला आहे. राज्यात जवळजवळ 700 किमी किनाऱ्यावर शेती असलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
चक्रीवादळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, हिमवर्षाव, टोळधाड, दुष्काळ, ढगफुटी, अवेळी पाऊस, अतिवृष्टी,वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीसाठी सरकारकडून मदत मिळते. त्यात आता समुद्राच्या उधाणामुळे झालेल्या नुकसानीची भर पडली आहे.
अशी मिळणार मदत –
> कोरडवाहू क्षेत्राचे नुकसान झाल्यास - प्रति हेक्टर 6 हजार 800 रुपये
> आश्वासित सिंचन असलेल्या क्षेत्राचे नुकसान झाल्यास - 13 हजार 500 रुपये
> बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाल्यास - 18 हजार रुपये प्रति हेक्टर
> खारे पाणी शेतजमिनीमध्ये घुसून शेतजमिनीचे कायमस्वरुपी नुकसान झाल्यास - प्रति हेक्टर 37 हजार 500 रुपये (हेही वाचा: चर्चेत तोडगा निघाल्याने शेतकरी समाधानी; किसान सभेचे आंदोलन मागे)
शेतीचे 33 टक्के किंवा त्यापेक्षा अधिक नुकसान झाल्यास ही मदत मिळणार आहे. मात्र अशा प्रकारचे नुकसान होऊ नये यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे. यासाठी खारभूमी प्रतिबंधक बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाने त्यासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.