नुकताच देशभरात गणेशोत्सवाचा सण धुमधडाक्यात साजरा झाला. आता नवरात्रीचे वेध लागले आहेत. कोरोना महामारीनंतर जवळपास दोन वर्षांनी यंदा सण उत्साहात साजरे होत आहेत. अशा परिस्थितीत मिठाई व अन्नधान्य खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. मात्र या सणासुदीच्या काळात अनेक ठिकाणी भेसळयुक्त खाद्यपदार्थ ग्राहकांना विकले जातात. याबाबत अन्न व औषध प्रशासन (Food and Drug Administration) सतर्क झाले आहे. एफडीएने पुण्यातील वानवडी येथील बनावट पनीरच्या (Fake Paneer) कारखान्यांवर छापा टाकून सर्व साठा जप्त केला आहे.
नुकतेच अन्न व औषध प्रशासन कार्यालयाच्या वतीने एम. टिपटॉप डेअरी प्रॉडक्ट्स या विनापरवाना कारखान्यावर छापा टाकण्यात आला. या ठिकाणी बनावट पनीर बनवले जात असल्याचे आढळून आले. या ठिकाणाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या कारखान्यावर छापा टाकला असता 800 किलो बनावट पनीर तयार केल्याचे आढळून आले. हे पनीर बनवण्यासाठी 350 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 270 किलो पामोलिन तेल साठवले होते.
साठ्यातून 1,67,790 रुपये किमतीचे 799 किलो पनीर, 1,21,800 रुपये किमतीची 348 किलो स्किम्ड मिल्क पावडर आणि 39,664 रुपये किमतीचे 268 किलो आरबीडी पामोलिन तेल जप्त करण्यात आले. याची एकून किंमत 3,29,254 रुपये आहे. पनीर हा नाशवंत पदार्थ असल्याने जप्त केलेला साठा जागेवरच नष्ट करण्यात आला. सदरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. अहवाल येताच कायदेशीर कारवाई केली जाईल. (हेही वाचा: लम्पी रोग नियंत्रणासाठी यंत्रणा सज्ज; प्रत्येक जिल्ह्याला होणार औषधांचा पुरवठा, पशुधनाची हानी झाल्यास मिळणार नुकसान भरपाई)
सहायक आयुक्त बाळू ठाकूर आणि अन्न सुरक्षा अधिकारी नीलेश खोसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. सणासुदीच्या काळात ग्राहकांची फसवणूक होऊन निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची विक्री होण्याची शक्यता असते. याबाबत नागरिकांनी 1800222365 या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन प्रशासनाच्या पुणे विभागाचे सहआयुक्त संजय नारागुडे यांनी केले आहे. तक्रारदारांची नावे गोपनीय ठेवली जातील. याआधी एफडीएने पुण्यातील हवेली तालुक्यात नागली पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर धडक कारवाई करत 900 किलो बनावट पनीर जप्त केले.