Extramarital Affair | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

परपुरुषावर जीव जडलेल्या एका विवाहीत महिलेने चक्क तिच्या नवऱ्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विवाहबाह्य संबंधातून (Extramarital Affair) ही महिला चक्क सुपारीच देऊन थांबली नाही तर नवऱ्याचा करेक्ट कार्यक्रम कसा होईल यासाठी तिने प्रयत्न सुरु केले आणि सुपारी दिलेल्या व्यक्तीसोबत कटही आखला. सुपारी घेतलेला व्यक्ती कोणी दुसरा तिसरा नव्हता तर तो तिचा प्रियकरच (Boyfriend) होता. पतीवर जीवघेना हल्ला झाल्यानंर मुंबई पोलिसांनी संबंधित महिला आणि तिचा प्रियकर अशा दोघांनाही अटक केली आहे.

मुंबई शहरातील अंधेरी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या (Andheri Mumbai) जुनी पोलीस वसाहत परिसरात कोर्ट गल्लीजवळ विरेन दिनेश शहा या 38 व्यक्तीवर जीवघेना हल्ला झाला. दोन अज्ञात व्यक्तींनी त्याच्यावर धारधार शस्त्रांनी हल्ला केला. हल्ला होताच दोन्ही आरोपी स्कूटरवर बसून अंधेरी कोर्टाच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. दरम्यान, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत दोन्ही आरोपींना तत्काळ बेड्या ठोकल्या. (हेही वाचा, 53 टक्के विवाहित भारतीय महिलांनी ठेवले आहेत विवाहबाह्य संबंध; देशातील Married Women बाबतच्या सर्वेक्षणामधून समोर आले धक्कादायक सत्य)

पोलिसांनी केलेल्या तपासात धक्कादायक माहिती पुढे आले. आरोपी हे मुळचे गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवाशी आहेत. पोलिसांनी एक पथक तयार करुन सुरत शहरात जाऊन सापळा रचला आणि नाडीयाड वेस्ट पोलीस ठाण्याच्या मदतीने आरोपीस ताब्यात घेतले. जीवनकुमार बारोट (वय 26 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अभिषेक जीवनकुमार बारोट याने आपल्या साथीदाराचे नावही सांगितले. अभिषेक याच्या माहितीवरुन पोलीसांनी विपुल प्रविणभाई पटेल (वय 35 वर्ष) याला ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्यामुळे दोघांनाही अटक झाली आहे.

विवाहबाह्य संबंधातून हे कृत्य झाल्याचे पोलीस तपासात उघड झाले. हल्ला झालेल्या तरुणाच्या पत्नीसोत विपुल प्रविणभाई पटेल याचे विवाहबाह्य संबंध होते. त्यातूनच हा हल्ला झाल्याचे आरोपींनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली अॅक्टिव्हा स्कूटर, गुन्हा करताना वापरलेले कपडे आणि हत्यार जप्त करण्यात आलेले आहे.