Dhananjay Munde | (Photo Credits: Facebook)

महाराष्ट्र सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या प्रकरणी दाखल झालेल्या आरोपपत्रात मोठा खुलासा झाला आहे. मुंडे यांना ब्रेन स्ट्रोक आल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. मुंडे यांची आपण दुसरी पत्नी असल्याचा दावा करणाऱ्या करुणा शर्माची बहिण रेणू शर्माने केलेल्या छळाच्या आरोपानंतर मुंडे यांची मानसिक तणावामुळे त्याची प्रकृती खालावली. 13 एप्रिल रोजी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शनिवारी रेणू शर्मा हिच्यावर खंडणीच्या आरोपाखाली आरोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

क्राइम ब्रँचने 20 एप्रिल रोजी रेणूला मध्य प्रदेशातील इंदूर येथून मुंडे यांच्याकडे 5 कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी अटक केली होती. रेणूकडे उत्पन्नाचे कोणतेही साधन नसून तिच्या बँक खात्यांमध्ये मोठे व्यवहार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी सांगितले की, 2017 मध्ये बँकेच्या ओशिवरा शाखेत उघडलेल्या खात्यात मोठी रक्कम जमा झाली होती आणि फेब्रुवारीमध्ये फक्त 6,652 रुपये शिल्लक होते.

याबाबत पोलिसांनी इंदूरच्या एका डेव्हलपरचे निवेदनही नोंदवले, ज्याने सांगितले की रेणूने फेब्रुवारीमध्ये इंदूरमधील नेपेनिया रोडवरील बीसीएम पार्कमध्ये सुमारे 54.2 लाख रुपयांना डुप्लेक्स घर खरेदी केले होते. खंडणीच्या पैशातूनच हा डुप्लेक्स खरेदी केल्याचा दावा करणारी कागदपत्रे जोडली गेली. रेणूला हवालामार्फत 50 लाख रुपये आणि आयफोन दिल्याचे मुंडे यांनी सांगितले होते. मुंढेंच्या वतीने इंदूरमध्ये रेणूला पैसे दिल्याचे दोन हवाला ऑपरेटर्सनी आपल्या जबानीत म्हटले आहे.

आता आरोपपत्रात म्हटले आहे की, ‘सततचा छळ आणि खंडणीच्या मागणीमुळे मुंडे नैराश्यात गेले. त्यांना 12 ते 16 एप्रिल दरम्यान रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना ब्रेन स्ट्रोक आला आणि त्यानंतर त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले, तेथे त्यांच्यावर उपचार करण्यात आले.’ यामध्ये त्यांची हॉस्पिटलायझेशनची कागदपत्रे आणि त्याचा वैद्यकीय अहवाल जोडला गेला आहे. (हेही वाचा: सदाभाऊ खोत आगोदर बिलाचे पैसे द्या, मग बोला; हॉटेल मालकाने अडवला ताफा,घटनेची जोरदार चर्चा, व्हिडिओही व्हायरल)

आरोपपत्रात पुढे म्हटले आहे की, रेणूने ओशिवरा पोलिसांत खोटी तक्रार दाखल करून मुंडे यांना बलात्कार प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला होता. करुणा आणि मुंडे यांच्यात सुरू असलेल्या न्यायालयीन वादात मुंडे यांच्यावर दबाव आणण्यासाठी रेणूने हा आरोप केल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.