Sadabhau Khot | (Photo Credit - Twitter)

निवडणुकीच्या रणधुमाळीत उमेदवार अनेकदा वारेमाप खर्च करतात. हॉटेल, जेवणावळी यांची रेलचेल असते. पण निकाल लागला की बिल भागवायचे विसरुन जातात. मग हॉटेल मालक काही काळ वाट पाहतात आणि बिल मिळण्याची शक्यता धुसर झाली मग थेट त्या तत्कालीन उमेदवारालच गाठतात. माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याबाबतही काहीसे असेच झाले. सदाभाऊ खोत यांनी लोकसभा निवडणूक 2014 (Lok Sabha Election 2014) माढा (Madha) मतदारसंघातून लढवली. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी कथीतरित्या हॉटेलमध्ये जेवण दिले. पण, या जेवनाचे बिल भरणे मात्र ते सोईस्करपणे विसरले. त्यामुळे वाट पाहून थकलेल्या एका हॉटेलमालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफाच अडवला. याबाबत एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. मात्र, या व्हिडिओत सदाभाऊ खोत दिसत आहेत.

घडले असे की, सदाभाऊ खोत हे आज सोलापूर दौऱ्यावर होते. पंचायत राज्य समिती दौऱ्यानिमित्त ते सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे आले होते. सदाभाऊ यांचे आगमन होणार म्हणून त्यांच्या रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांचा गर्दी केली होती. ठरल्याप्रमाणे सदाभाऊ आलेही. सदाभाऊ आपल्या वाहनातून खाली उतरणार इतक्यात अशोक शिनगारे हे सदाभाऊंच्या समोर आले. अशोक शिनगारे हे मांजरी येथील हॉटेल व्यवसायिक आहेत. त्यांनी सदाभाऊ खोत यांना थेट जाब विचारण्यास सुरुवात केली. 'सदाभाऊ बिल द्या. सन 2014 मधले थकीत बिल आहे. ते आगोदर द्या आणि मगच पुढे जा'. (हेही वाचा, Sadabhau Khot: सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल, कार्यकर्तयाला घरात घुसुन मारहाण केल्याचा आरोप)

अशोक शिनगारे यांनी सदाभाऊ यांना थेटच जाब विचारण्यास आणि बिल मागण्यास सुरुवात केली. तेही इतक्या गर्दीत. त्यामुळे सदाभाऊसुद्धा काही क्षण गोंधळून गेले. थोड्यावेळात सावरल्यावर सदाभाऊ खोत म्हणाले, 'तुमचे कसले पैसे मला खरोखरच माहिती नाही. पण जर असतील तर नक्की देऊन टाकू. ' यावर शिनगारे म्हणाले, तुम्ही मंत्री झाला तेव्हाही ''लगा मी आता मंत्री झालो तुझे कसले पैसे मला माहिती नाही' असे म्हणत मला तुम्ही आपमानीत केले. ते बाकीचे काहीही असो. तुम्ही मला माझे पैसे द्या'. शिनगारे यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली.

ट्विट

दरम्यान, सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेचे दीपक भोसले, शंभू माने, भारत चव्हाण प्रा संजय देशमुख यांनी शिनगारे यांना समजाविण्याचा प्रयत्न केला. यावर शिनगारे चांगलेच संतापले. त्यांनी तुम्ही कोणीच मध्ये पडायचे नाही. मला माझे पैसे मिळाले पाहिजे. मी कार्यक्रम संपल्यावरही सदाभाऊ खोत यांना पैसे दिल्याशिवाय जाऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला. अखेर हे प्रकरण थेट पोलीस ठाण्यात पोहोचले.

काय आहे प्रकरण?

लोकसभा निवडणूक 2014 मध्ये माडा लोकसभा मतदारसंघात सदाभाऊ खोत हे भाजपचे उमेदवार होते. या वेळी निवडणूक प्रचारावेळी सदाभाऊ खोत यांच्या मुलाने कार्यकर्त्यांना शिनगारे यांच्या हॉटेलमध्ये नेले. या वेळी जेवणाचे बील 66, 450 इतके झाले. मात्र, या वेळी त्यांनी पैसे नंतर देतो असे सांगून सदाभाऊ याचे चिरंजीव बाहेर पडले. निवडणुकीत सदाभाऊ खोत यांचा पराभव झाला. रखडलेले बिल मात्र उधारीवर तसेच राहिले. यावर शिनगारे यांनी उधारीच्या थकीत बिलासाठी अनेकदा पाठपुरावा केला. मात्र, बघू, देऊ, असे म्हणत चालढकल केली गेली. त्यामुळे आता वैतागलेल्या हॉटेल मालकाने बहुदा सदाभाऊ खोत यांनाच गाठले असावे. घडल्या प्रकाराची मात्र राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे.