परीक्षा (Photo Credit: PTI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर MPSC कडून जिल्ह्यात केंद्र निवडण्यासाठी 20 ऑगस्टपर्यंत मुतदवाढ देण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्राच्या ठिकाणी पोहोचणं शक्य होणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी आपल्याला शक्य होईल, अशा जवळच्या परीक्षा केंद्राची निवड करण्यासाठी आयोगाने मुदतवाढ दिली आहे. एमपीएससीच्या या निर्णयामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.

लोकसेवा आयोगाने उमेदवारांच्या सोयीसाठी 11 ऑक्‍टोबरला होणाऱ्या महाराष्ट्र दुय्यम सेवा पूर्व परीक्षेच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सोयीने जिल्हा केंद्र निवडण्याची संधी दिली आहे. तसेच 20 सप्टेंबरच्या राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी पुणे केंद्र निवडलेल्या दुसऱ्या विभागातील विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र बदलण्यासाठी आयोगाने 20 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ दिली आहे. (हेही वाचा - खुशखबर! महाराष्ट्रात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ST Bus ला परवानगी)

दरम्यान, जिल्हा केंद्र निवड न करणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी भरलेल्या त्यांच्या अर्जातील कायमस्वरुपी रहिवासीचा पत्ता असलेल्या जिल्ह्यातील परीक्षा केंद्रावर प्रवेश मिळणार आहे. जिल्हा केंद्राची क्षमता संपुष्टात आल्यानंतर जिल्हा केंद्राची निवड न करणाऱ्या अथवा निवड करु न शकलेल्या उमेदवाराला आयोगाकडून उपलब्ध केलेल्या केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. तसेच नव्याने जिल्हा केंद्र निवडण्यासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या आयोगाकडील नोंदणीकृत मोबाईल, दूरध्वनी क्रमांकावर संदेश दिला जाणार आहे.