खुशखबर! महाराष्ट्रात आता एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करण्यासाठी ST Bus ला परवानगी
ST Bus (Image used for representational purpose only) (Photo credits: PTI)

कोरोना व्हायरस (Coronavirus) विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशात मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून लॉक डाऊन (Lockdown) सुरु होते. या काळात सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूक बंद होती. मात्र आता महाराष्ट्रामध्ये ठाकरे सरकारने महत्वाचा निर्णय घेत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटी बसेस (ST Bus) चालवण्यासाठी परवानगी दिली आहे. सध्या तरी ही परवानगी फक्त एसटी बससाठी असणार आहे. मात्र असे असले तरी, आता इतक्या महिन्यानंतर जिल्ह्याबाहेर एसटी बस सेवा सुरू होणार असल्याने सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या फक्त जिल्हांतर्गत एसटीची वाहतूक सुरु आहे.

कोरोना विषाणूमुळे 22 मार्च पासून राज्यात एसटीची सेवा बंद होती. त्यामध्ये शिथिलता आणत जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु करण्यात आली होती. मात्र आता काही नियमांचे पालन करत, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी एस बस सेवेला परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी ईपासही गरज नसणार आहे. मात्र इतर खासगी चारचाकी वाहनांसाठी ईपास आवश्यक असणार आहे. याआधी सरकारने आंतरजिल्हा एसटी सुरु करण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्यावेळी त्याला ग्रामीण भागातून विरोध झाला होता. शहरामधून कोरोनाचा प्रसार गावाकडे होऊ नये म्हणून एसटी ची सेवा सुरु होऊ शकली नव्हती, आता ती झाली आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत जाणुन घ्या)

दरम्यान लॉक डाऊनमुळे एसटीचा कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडाला आहे. ही तुट भरून काढण्यासाठी सरकारने एक उपाय योजला आहे. प्रवासी वाहतुकीव्यतिरिक्त एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने उत्पन्नाचा नवा स्त्रोत म्हणून, एसटी महामंडळ लवकरच सर्वसामान्य लोकांसाठी पेट्रोल आणि डिझेलपंप सुरु करणार आहे. त्यासाठीचा सामंजस्य करार काल एसटी महामंडळ आणि इंडियन ऑइल यांच्यात करण्यात आला. एसटी महामंडळाच्या मोकळ्या जागेवर 30 ठिकाणी पेट्रोल पंप तर 5 ठिकाणी LNG पंप सुरू करणार आहेत. सदर पंप इंडियन ऑइलकडून बांधण्यात येणार असून त्याचे नियंत्रण महामंडळाकडून करण्यात येणार आहे.