Pune Shocker: ब्रेकअप झाल्याने संतापलेल्या तरुणाने केली प्रेयसीच्या आईची हत्या; आरोपीला अटक
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Pune Shocker: पुण्यातून (Pune) अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे. ब्रेकअप (Breakup) झाल्यामुळे संतापलेल्या तरुणाने रागाच्या भरात प्रेयसीच्या आईचा कुत्र्याच्या पट्ट्याने गळा आवळून खून (Murder) केला. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये ही घटना समोर आली आहे. शिवांशू दाचाराम गुप्ता (23, रा. प्रतीकनगर, येरवडा) असे आरोपीचे नाव आहे. पाषाण येथील मृण्मयी क्षीरसागर (22) या तरुणीने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली. वर्षा क्षीरसागर (58) असे मृत महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृण्मयीचे वडील एका मोठ्या कंपनीत अभियंता होते. त्यांचे 1 जानेवारी रोजी निधन झाले. मृण्मयी देखील संगणक अभियंता आहे. नुकतीच तिने नोकरी सोडली होती. दरम्यान, ती आरोपी शिवांशूशी डेटिंग अॅपद्वारे भेटली होती. शिवांशू एका नामांकित फूड कंपनीत डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. तो आणि त्याचे वडील तीन वर्षांपूर्वी नोकरीसाठी पुण्यात आले होते. (हेही वाचा -Pune Shocker: पिपंरीचिंचवड येथे दीराला पोलिसांत पकडून दिल्याच्या रागात पत्नीचा खून, दोघांना अटक, एक फरार)

शिवांशू आणि तक्रारदार दोघेही गेल्या सात महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. नुकतेच त्याने तक्रारदाराशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच शिवांशूने मृण्मयीच्या आईची भेट घेतली. पण शिवांशूची आर्थिक परिस्थिती आणि त्याची नोकरी लक्षात घेऊन तिच्या आईने त्यांच्या नात्याला विरोध केला. तसेच तिने आपल्या मुलीला लवकरात लवकर हे नाते संपवण्यास सांगितले. (हेही वाचा - मुंबईत BMC कर्मचाराने राहत्या घरात घेतला गळफास, सुसाईट नोटमध्ये लिहलं कारण)

दरम्यान, मुलीने आईच्या म्हणण्याप्रमाणे शिवांशूसोबतचे संबंध तोडले. यामुळे शिवांशू संतापला होता. मृण्मयी घरातून बाहेर पडल्यानंतर गुरुवारी मध्यरात्री शिवांशू तिच्या घरी आला. सुरुवातीला त्याने मृण्मयीच्या आईला संधी देण्याची विनंती केली आणि तिची काळजी घेण्याचे वचन दिले. मात्र, तिने पुन्हा एकदा नकार दिला. त्यामुळे तो चिडला आणि तिच्याशी वाद घालू लागला. त्याने कुत्र्याच्या पट्ट्याने गळा आवळून घटनास्थळावरून पळ काढला.

तथापी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, पोस्टमॉर्टम अहवालाच्या आधारे खून उघडकीस आला असून इतर माहिती व परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे आम्ही त्याला अटक करू, असं आश्वासन पांढरे यांनी दिलं आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.