Traffic | Pixabay.com

अटल सेतूला वांद्रे वरळी सी लिंक सोबत जोडण्यासाठी वरळी शिवडी एलिव्हेटेड मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी एलफिस्टन पूल (Elphinstone Bridge) वाहतूकीसाठी बंद करण्यात येत आहे. ट्राफिक विभागाने आजपासून त्यासाठी वाहतूकीच्या मार्गामध्ये बदल केले आहेत. त्यामुळे परळ भागातून अनेक वाहनांना वळसा घालून पुढे जावे लागणार आहे. दरम्यान 13 एप्रिल पर्यंत नागरिकांना पर्यायी वाहतूकीच्या मार्गासाठी हरकती पाठवण्याचे आवाहन देखील केले  आहे.  addlcp.traffic@mahapolice.gov.in वर सूचना पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आता पुढील 2 वर्ष एलफिस्टन पूल वाहतूकीसाठी बंद राहणार आहे.

 Mumbai Traffic Police यांची पोस्ट

 एलफिस्टन ब्रीज बंद केल्याने पर्यायी मार्ग कोणते?

दादर पश्चिमेकडे जाणार्‍यांना परळ मध्ये मडकेबुवा चौक मधून उजव्या बाजूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड, खोदादाद सर्कल मधून डावे वळण घेऊन टिळक ब्रीजने पुढे जावे लागणार आहे.

प्रभादेवी, वरळी कडे जाणार्‍यांनाही मडके बुवा चौकातून कृष्णनगर जंक्शन-परेल वर्कशॉप-सुपारी बाग जंक्शन, भारतमाता जंक्शनमधून उजवे वळण घेऊन करी रोड वरून लोअर परेल ब्रीज मार्गे जावे लागणार आहे.

सेनापती बापट मार्गाने प्रभादेवी पूल मार्गे सायन, माटुंगा कडे जाणार्‍यांंना सेनापती बापट मार्गावरून व्हीएस मटकर मार्ग व बाबूराव परूळेकर मार्गाने उजव्या  बाजूचे वळण घेत भवानी शंकर रोड, कबुतर खाना येथून टिळक ब्रीज मार्गे खोदादाद सर्कलने पुढे जावे लागणार आहे. Drunk Driving Case in Mumbai Bail: सिग्नल वर 'Don't Drink & Drive' चा बोर्ड घेऊन 3 महिने उभे रहा; मुंबई उच्च न्यायालयाने आयुष्यभर लक्षात राहणारी शिक्षा देत दिला जामीन .

एलफिस्टन पूल बंद केला जात असल्याने शहराच्या मध्यवर्ती भागात होणार्‍या वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर आता ना.म.जोशी मार्ग, सेनापती बापट मार्ग, महादेव पालव मार्ग, साने गुरूजी मार्ग, भवानी शंकर मार्ग, रावबहादूर एस के बोले मार्ग या रोड वर 'नो पार्किंग झोन' करण्यात आले आहेत.  परळ आणि प्रभादेवीमध्ये पूर्व-पश्चिम दिशेने प्रवास करण्यासाठी पादचाऱ्यांना वन इंटरनॅशनल सेंटरजवळील प्रभादेवी आणि परळ रेल्वे स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी रेल्वे पुलाचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.