Eknath Shinde | (Photo Credits: Twitter/ANI)

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) याने मुंबईतील एका शोदरम्यान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर व्यंग्यात्मक गाणे सादर केले, ज्यामध्ये त्याने शिंदे यांचा उल्लेख ‘गद्दार’ असा केला. या प्रकरणावर वाद वाढत असताना एकनाथ शिंदे यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिंदे म्हणाले, ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्ही व्यंग्य समजतो, परंतु त्यालाही एक मर्यादा असावी.’ तसेच, त्यांनी आपण शिवसैनिकांच्या तोडफोडीच्या कृतीचे समर्थन करत नाही, मात्र प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते, असे सांगितले. कुणाल कामराचा व्हिडीओ समोर आल्यानंतर शिवसेना समर्थकांनी मुंबईतील हॅबिटॅट कॉमेडी क्लबमध्ये तोडफोड केली, जिथे कामराचा शो आयोजित करण्यात आला होता.

बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत शिंदे यांनी कामराच्या हेतूंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असे नमूद केले की, हा विनोदी कलाकार कोणाच्या तरी इशाऱ्यावर काम करत आहे. ते म्हणाले, ‘लोकशाहीत स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे, परंतु वैयक्तिक हेतूंसाठी एखाद्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणे अस्वीकार्य आहे. मला विसरून जा, मोदीजी, माजी सरन्यायाधीश, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, गृहमंत्री अमित शहा आणि इतर उद्योगपतींबद्दल त्याने खूप काही म्हटले आहे.  त्याच्या वर्तनामुळे त्याला विमान प्रवासावर बंदी घालण्यात आली आहे आणि त्याने सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवल्याचा आरोप आहे, तर अशा व्यक्तीच्या मागे कोणाचा हात आहे?’,  असा प्रश्न त्यांनी विचारला.

त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तोडफोडीबद्दल विचारले असता, शिंदे म्हणाले की ते अशा कृत्यांना समर्थन देत नाहीत. एकनाथ शिंदे एक व्यक्ती म्हणून आपण खूप संवेदनशील आहोत. माझ्यावर अनेक आरोप केले जातात, पण मी माझ्या कामाने त्यांना उत्तर देतो. मी तोडफोडीचे समर्थन करत नाही, परंतु ते पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावनांमुळे घडले. प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया असते, पण मी त्याचे समर्थन करत नाही.’ कामराच्या वक्तव्यामागे मोठे राजकीय षड्यंत्र असल्याचा आरोपही शिंदे यांनी केला. विरोधी पक्ष अशा घटना घडवून आणत असल्याचे त्यांनी सुचवले. ते म्हणाले, ‘लोकांचा जाणूनबुजून अपमान करणे हा ठरवून केलेली कृती आहे’. (हेही वाचा: Kunal Kamra Controversy: कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील 'गद्दर' वक्तव्याबद्दल मुंबई पोलिसांनी बजावले समन्स)

Eknath Shinde on Kunal Kamra's Comment: 

दरम्यान, कुणाल कामराने मुंबईतील खार परिसरातील हॅबिटॅट स्टुडिओमध्ये 'दिल तो पागल है' चित्रपटातील एका गाण्याचे सुधारित रूप वापरून, एकनाथ शिंदेंवर टीका केली होती. त्यानंतर रविवारी रात्री मोठ्या संख्येने शिवसेनेचे कार्यकर्ते हॉटेल युनिकॉन्टिनेंटल (जिथे क्लब आहे) बाहेर आले आणि त्यांनी क्लब आणि हॉटेलच्या परिसरात तोडफोड केली. मुंबईच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, सोमवारी पहाटे कुणाल कामराविरुद्ध बीएनएसच्या विविध कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला. आता उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याविरुद्ध अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल मुंबई पोलिसांनी कुणाल कामराला समन्स बजावले आहे.