Eknath Shinde Becomes BA Graduate: एकनाथ शिंदे झाले ग्रॅज्युएट!  रिक्षाचालक ते कॅबिनेट मंत्री आणि आता पदवीधर; जाणून घ्या प्रवास
Eknath Shinde | (Photo Credits: Facebook)

राज्याचे नगरविकासमंत्री, ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पदवीधर (Eknath Shinde Becomes BA Graduate) झाले आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ (YCMOU) द्वारे घेतल्या जाणाऱ्या अंतिम वर्ष पदवी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या निकालात एकनाथ शिंदे यांचेही नाव आले.गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही ठाणे येथील ज्ञानपीठ विद्यालयाचा निकाल 100% लागला. पालकमंत्री एकनाथ शिंदे 77.25% गुण मिळवून उत्तीर्ण झाले. इयत्ता 10 नंतर शिक्षण थांबलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde ) आता पदवीधर झाले आहेत. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. दरम्यान, एक सर्वसामान्य रिक्षाचालक, शिवसैनिक ते कॅबिनेट मंत्री आणि आता पदवीधर हा शिंदे यांचा प्रवास (Eknath Shinde Life Journey) मोठा संघर्षाचा राहिला आहे.

एकनाथ शिंदे यांचे बालपण खडतर गेले. त्यांच्या वडिलांचा ट्रेम्प आणि रिक्षाचा व्यवसाय होता. ते नोकरीही करत. घराला हातभार लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांनीही सुरुवातीला वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी केली. त्यानंतर काही काळ रिक्षाही चालवली. दरम्यन, काही कारणांनी ते ठाण्यातील शिवसेना नेते अनंत दिघे यांच्या संपर्कात आले. तेव्हापासून त्यांनी शिवसैनिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी स्थानिक शिवसैनिक ते शाखाप्रमुख म्हणून काम केले.

1997 मध्ये एकनाथ शिंदे हे नगरसेवक म्हणून ठाणे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडूण गेले. त्यानंतर 2004 मध्ये शिंदे यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणूक लढवली. तेव्हापासून सलगपणे विधानसभेवर निवडून येत आहेत. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून ते शिवसेना तिकीटावर प्रतिनिधित्व करतात. 2019 मध्ये शिवसेना विधीमंडळ गटनेते म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

एकनाथ शिंदे यांच्याकडे सध्या राज्याचे नगरविकास मंत्रीपद आहे. शिवसेनेचे ते एक महत्त्वपूरण नेते म्हणून ओळकले जातात. 2014 मध्ये काँग्रेसविरोधी आणि नरेंद्र मोदी यांच्या बाजूची लाट असतानाही ठाणे येथील शिवसेनेचा गड कायम ठेवण्यात एकनाथ शिंदे यशस्वी राहिले होते.