मागील काही दिवसांपासून भाजप नेत्या पंकजा मुंडे पक्षासोबत खुश नसल्याने लवकरच भाजप सोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात दिसून येत आहेत. त्याचसोबत त्यांनी फेसबुकवर आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून लिहिलेली पोस्ट देखील तसेच संकेत देते. इतकंच नव्हे तर पंकजा यांनी आपल्या ट्विटर हॅण्डलवरून भाजपचा टॅग देखील काढून टाकल्याने या चर्चांवर आता शिक्कामोर्तब होण्याची चिन्ह दिसत आहेत.
भाजपमध्ये पंकजा मुंडेच नाहीत तर एकनाथ खडसे देखील पक्षावर नाराज आहेत. त्यांनी तर भाजपविरुद्ध आक्रमक पवित्र घेतल्याचा दिसून येतो. दैनिक लोकमतने दिलेल्या एका वृत्तानुसार, एकनाथ खडसे यांनी भाजपच्या काही नेत्यांवर रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांना मुद्दाम पडल्याचा अप्रत्यक्ष आरोप केला आहे.
लोकमतशी बोलताना खडसे म्हणाले की डॉ. रोहिणी खडसे यांना पाडण्यात आलंच, पण पंकजा मुंडे यांच्याही कार्यकर्त्यांचा असाच आरोप आहे. त्याचसोबत एकनाथ खडसेंनी आता या विरुद्ध कारवाई करण्याचे ठरवले आहे. ते म्हणाले की याबाबत त्यांनी पुरावे गोळा करुन, पाडापाडीचं काम करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी वरिष्ठांकडे केली आहे.
पंकजा मुंडे यांना कसं पाडण्यात आलं याबद्दल लोकमतशी संवाद साधताना एकनाथ खडसे म्हणाले, “पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळेच पंकजा मुंडे यांना पाडण्यात आलं, इतकंच नाही तर त्यांच्याविरोधातील राष्ट्रवादीचे उमेदवार धनंजय मुंडे यांनाही मदत पुरवण्यात आल्याचं पंकजांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे.”
पंकजा मुंडे यांच्या नव्या फेसबूक पोस्टमुळे भाजपचे वरिष्ठ नेते, कार्यकर्ते होणार खूश
दरम्यान असंही बोललं जात आहे की मुंबईतील भाजपचं बडं प्रस्थ असलेले प्रकाश मेहता देखील भाजप मधील काही नेत्यांवर नाराज आहेत. त्यामुळे 12 डिसेंबर रोजी पंकजा मुंडे, एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांच्यात एक महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता आहे.