शिवसेना-भाजप (Shiv Sena-BJP) यांच्यातील सत्तासंघर्षामुळे सत्तेमध्ये पोहोचण्याचा भाजपचा खेळ बिघडला. त्यात भाजपने दाखवलेलेले आक्रमक राजकारणही भाजपच्या चांगलेच अंगाशी आले. या सर्व घडामोडीनंतर आता भाजपमधी जेष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनीही पक्ष आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर नामोल्लेख टाळत जोरदार टीकास्त्र सोडले आहे. पक्ष निर्णय घेतो. पक्ष कधी चुकत नसतो. पण, सर्वांना सोबत घेऊन लढले असते तर पक्षाच्या 20-25 जागा आणखी वाढल्या असत्या. पक्ष विस्तार झाला असता असा शालजोडा लगावतानाच 'सिंच घोटाळ्याचे पेपर रद्दीत विकले' (Maharashtra Irrigation Scam ) असे म्हणत सणसणीत चपराकही खडसे यांनी भाजप (BJP) आणि नेतृत्वाला लगावली आहे.
भाजपकडून सत्तास्थापनेच्या खेळाचा खेळखंडोबा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांनी एकनाथ खडसे यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. या वेळी बोलताना खडसे म्हणाले, आम्ही लोक दगड धोंडे, शेण मारत असतानाही पक्ष वाढवला. गेली अनेक वर्षे पक्षासाठी काम केले. असे असतानाही आमचे तिकीट पक्षाने कापले. पण, मी, विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे, अजय मेहता यांसारख्या लोकांचे तिकीट कापूनही आम्हाला जरी सोबत घेऊन प्रचार केला असता तरीसुद्धा पक्षाच्या जागा नक्की वाढल्या असत्या. पण, तसे घडले नाही, अशी खंतही खडसे यांनी बोलून दाखवली.
दरम्यान, सिंचन घोटाळ्याचे बैलगाडीभर पुरावे दिले होते त्याचे काय झाले? असे विचारताच खडसे म्हणाले, त्या वेळी रद्दीला चांगला भाव होता. सिंचन घोटाळ्याचे कागद आम्ही रद्दीत विकले, अशा शब्दांत खडसे यांनी भाजपला घरचा आहेर दिला. दरम्यान, अजित पवार यांना भाजपसोबत घेणे ही पक्षाची चूक होती का? असे विचारले असता या प्रश्नावर बोलण्यास खडसे यांनी नकार दिला.
एकनाथ खडसे हे देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात महसूल खात्याचे मंत्री होते. महसूल खात्यासोबतच त्यांच्याकडे बारा खात्याचा कारभारही होता. त्यामुळे फडणीस मंत्रिमंडळात ते क्रमांक दोनचे मंत्री म्हणून ओळखले जात. परंतू, भोसरी येथील भूखंड घोटाळा प्रकरण पुढे आले आणि खडसे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. (हेही वाचा, भगत सिंह कोश्यारी यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदावरुन हटवण्याची शक्यता; प्रसारमाध्यमांनी दिले वृत्त)
विशेष म्हणजे, देवेंद्र फडणीस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. मात्र, त्यातील सर्व मंत्र्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांना क्लिन चिट दिली. एकनाथ खडसे मात्र त्याला अपवाद ठरले. एकनाथ खडसे हे मंत्रिपदावरुन जे पायउतार झाले ते पुन्हा त्यांचे पुनर्वसन झालेच नाही. त्यांना अमदार म्हणूनच सभागृहातून निवृत्त व्हावे लागले. त्यात पुढे खडसे यांना राजकीय धक्का विधानसभा निवडणूक 2019 मध्ये बसला. या निवडणुकीत पक्षाने त्यांचे तिकीट कापले. पक्षकारांशी बोलताना पक्षाने आपले तिकीट का कापले हे अद्यापपर्यंत आपल्याला कळले नाही, असेही खडसे म्हणाले.