Dr. Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सचिन अंदुरे, शरद कळसकर दोषी; मास्टरमाईंडला अद्याप शिक्षा नाही
Dabholkar | Twitter

अंधश्रद्धा निर्मुलनाचं काम करणार्‍या समाजसुधारक नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) हत्या प्रकरणी आज (10 मे) 11 वर्षांनंतर सत्र न्यायालयाकडून निकाल जाहीर करण्यात आला आहे. पाच आरोपींपैकी दोन जण दोषी ठरवत तीन जणांना निर्दोष सोडण्यात आले आहे. सचिन अंदुरे (Sachin Andure), शरद कळसकर (Sharad Kalaskar) यांना दोषी ठरवत त्यांना जन्मठेप (Life Imprisonment) सुनावण्यात आली आहे. प्रकरणातील आरोपी वीरेंद्रसिंह तावडेवर कट रचल्याचा आरोप होता, परंतु सरकारी पक्ष पुरावे सादर करण्यात अपयशी ठरल्यामुळे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. तसेच, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे विरोधातही आरोप सिद्ध होत नाही, त्यामुळे त्यांनाही निर्दोष ठरवण्यात आली आहे.

नरेंद्र दाभोलकर यांच्या मुलांनी आपण निकालाचा मान राखतो पण अद्याप या हत्येमध्ये मास्टरमाईंडला अद्याप शिक्षा न झाल्याने उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिले जाणार असल्याचं म्हटलं आहे. या प्रकरणामध्ये सचिन अंदुरे, शरद कळसकर हे शूटर होते त्यांना सश्रम जन्मठेप ठोठावण्यात आला आहे. तसेच UAPA वगळण्यात आल्याने या निकालाला आव्हान दिलं जाणार असल्याचं दाभोलकरांच्या वकिलांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Dr. Narendra Dabholkar Murder Case: नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात आरोपींविरुद्ध यूएपीएसह विविध कलमांखाली आरोपपत्र दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश .

सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी, बचावपक्षाचे वकील प्रकश साळशिंगेकर, सीबीआयचे तपास अधिकारी, आरोपी संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे कोर्टात उपस्थित होते. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डॉक्टर होण्याऐवजी त्यांनी समाजकार्यात स्वत:ला गुंतवून घेतले. 1982 सालापासून अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीत त्यांचा पूर्ण सहभाग घेतला. 1989 मध्ये त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना केली. अनेक कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटना दाभोलकर यांना हिंदूविरोधी मानत होत्या. यामधूनच त्यांची पुण्यात 20 ऑगस्टला 2013 ला गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.