डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण: संजीव पुनाळेकर यांनी हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली: सीबीआय विशेष सरकारी वकील
Narendra Dabholkar and his murder accused being sent to CBI custody. (Photo Credit: ANI)

Dr. Narendra Dabholkar Murder Case: डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात विक्रम भावे (Vikram Bhave) याने रेकी केली आणि संजीव पुनाळेकर (Sanjeev Punalekar) याने गुन्ह्यातील हत्यारांची विल्हेवाट लावण्यास मदत केली, अशी माहिती सीबीआय (CBI) चे विशेष सरकारी वकील प्रकाश सूर्यवंशी यानी दिली आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर (Dr. Narendra Dabholkar) यांच्या हत्या प्रकरणाचा तपास धिम्या गतीने सुरु असला तरी, आता या तपासाने वेग घेतल्याचे चित्र आहे. या प्रकरणात सीबीआयने मुंबई येथून अटक केलेल्या विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर यांना पुणे न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी सरकारी वकिलांनी ही माहिती दिली. दरम्यान, न्यायालयाने पुनाळेकर आणि भावे या दोघांनाही 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. या वेळी विरेंद्र इचलकरंजीकर यांनी बचाव पक्षाचे वकील म्हणून काम पाहिले.

दरम्यान, सीबीआयचे विशेष सरकारी वकील, प्रकाश सूर्यवंशी यांनी युक्तीवाद करताना म्हटले की, डॉ. दाभोलकर यांची हत्या, त्यांच्या हत्येसाठी मारेकऱ्यांनी वापरलेली मोटरसायकल या मुद्द्यांवर विक्रम भावे याची चौकशी होणे आवश्यक आहे. तर, संजी पुनाळेकर याने डॉ. दाभोलकर आणि पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात वापरलेले पिस्तूल नष्ट करण्यासाठी मदत केली आहे. हा एक व्यापक कट असून हा कट उघडकीस आणण्यासाठी या दोघांची (भावे आणि पुनाळेकर) चौकशी करणे अत्यंत गरजेचे आहे. सीबीआय विशेष वकिलांचा युक्तीवाद ऐकल्यावर न्यायालयाने भावे आणि पुनाळेकर या दोघांनाही सीबीआय कोठडी सुनावली. न्यायाधीश एस. एम. सोनवणे यांनी हे आदेश दिले. ही कोठडी 1 जूनपर्यंत असणार आहे.

दरम्यान, आरोपी संजीव पुनाळेकर यांनीही न्यायालयात युक्तिवाद केला. या वेळी पुनाळेकर म्हणाले, मी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींच्या वतीने खटला लढत आहे. या प्रकरणात मी वकील आहे. तसेच, शरद कळसकर याने कर्नाटक पोलिसांना दिलेल्या जबाबाच्या अधारे मला अटक करण्यात आली आहे. केवळ आरोपींचा वकील आहे म्हणून माझ्यावर आणि माझ्या सोबत काम करतो म्हणून विक्रम भावे यांच्यावर कारवाई करणे चुकीचे आहे. अशा पद्धतीने कारवाई करणे योग्य होणार नसल्याचा युक्तीवादही आरोपी पुनाळेकर यांनी स्वत: केला. (हेही वाचा, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी मुंबईतून अटक करण्यात आलेल्या आरोपींना 1 जूनपर्यंत सीबीआय कोठडी)

दरम्यान, विक्रम भावे आणि संजिव पुनाळेकर यांच्या अटकेमुळे डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले असून, या प्रकरणाचा तपास पुढे कशी गती घेतो यावर बरेच काही अवलंबून असणार आहे.