डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाचा (Dr. Narendra Dabholkar Murder Case) केंद्रीय तपास यंत्रणांना दिलेला तपास देखील आता पूर्ण झाला असून त्याचा अहवाल तपास अधिकार्यांनी दिल्ली मध्ये CBI मुख्यालयामध्ये पाठवला आहे. येत्या 3 आठवड्यात सीबीआय त्यावर आपली भूमिका मांडणार आहे. दरम्यान आज सीबीआय कडून अतिरिक्त सॉलिसिटर अनिल सिंग यांनी ही माहिती मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
बॉम्बे हाय कोर्टामध्ये आज न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्या खंडपीठसमोर डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी झाली आहे. या सुनावणीमाध्ये अनिल सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पूर्ण झाला आहे. 32 पैकी 15 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. दिल्लीच्या सीबीआय मुख्यालयामध्ये तपासाचा अहवाल पाठवला आहे. त्यावर सीबीआय येत्या 3 दिवसांत आपला निर्णय जाहीर करणार असल्याचंही सिंग म्हणाले आहेत.
कायद्यातील तरतुदीनुसार, आरोपपत्र दाखल केल्यानंतर उच्च न्यायालयाने तपासावर देखरेख ठेवू नये. त्यामुळे न्यायालयाने देखील या प्रकरणाच्या तपासावर आता देखरेख ठेवू नये, अशी मागणी दाभोलकरांच्या हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी शरद कळसकर आणि विक्रम भावे यांच्याकडून न्यायालयाकडे करण्यात आली आहे. दरम्यान यावर दाभोलकर कुटुंबियांचे वकील अभय नेवगी यांनी या मागणीला विरोध केला आहे. याप्रकरणी अद्याप काही आरोपी फरार आहेत, हत्येसाठीचं हत्यार, हल्लेखोर घटनास्थळी आलेले ती बाईक या गोष्टी अजूनही सापडलेल्या नाहीत. अद्याप हत्येमागचं नेमकं कारण आणि सूत्रधार याचा थांगपत्ता नाही. त्यामुळे याप्रकरणी हायकोर्टाची देखरेख आवश्यकच असल्याचं त्यांनी कोर्टाला सांगितलं आहे.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 20 ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात हत्या करण्यात आली होती.